भंडारा विधानसभा मतदार संघावर भाजपाचा दावा

By Admin | Updated: July 17, 2014 23:53 IST2014-07-17T23:53:23+5:302014-07-17T23:53:23+5:30

लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नाही, असा ठपका ठेऊन लोकसभेतील विजयानंतर मनोबल वाढलेल्या भाजपने शिवसेनेच्या कोट्यातील भंडारा विधानसभेची

BJP claims on Bhandara assembly constituency | भंडारा विधानसभा मतदार संघावर भाजपाचा दावा

भंडारा विधानसभा मतदार संघावर भाजपाचा दावा

युतीत बिनसले : भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
भंडारा : लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नाही, असा ठपका ठेऊन लोकसभेतील विजयानंतर मनोबल वाढलेल्या भाजपने शिवसेनेच्या कोट्यातील भंडारा विधानसभेची जागा भाजपला देण्यात यावी, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय मोहोकर, राष्ट्रीय मच्छीमार सेलचे अध्यक्ष डॉ.प्रकाश मालगावे, जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, सभापती अरविंद भालाधरे, महामंत्री राजकुमार गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कडव, तालुकाध्यक्ष प्रशांत खोब्रागडे, धनराज जिभकाटे, शहर अध्यक्ष विकास मदनकर या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संयुक्त स्वाक्षरीचे निवेदन दिले.
परिसीमन आयोगाने केलेल्या मतदार संघाच्या पुन:रचनेपूर्वी भंडारा आणि अड्याळ-पवनी असे दोन स्वतंत्र मतदार संघ होते. त्यावेळी जागा वाटपात पवनी शिवसेनेकडे तर भंडारा भाजपकडे होता. त्यावेळी शिवसेनेला कधीही पवनी विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही.
याउलट भाजपाचे रामभाऊ आस्वले १५ वर्षे आमदार राहिले. दोन विधानसभा क्षेत्र एक झाल्यानंतर हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. भाजपने केलेली पक्षबांधणी आणि तळगाळातील लोकांना जोडल्यामुळे शिवसेनेला जागा जिंकता आली. परंतु या यशात सर्वाधिक वाटा भाजपचा होता, असेही या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमदाराने युतीधर्माला बगल देऊन भाजप उमेदवाराला मदत केली नाही, असे आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपचे प्राबल्य असून १६० पैकी १३० ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच आहेत. चार जिल्हा परिषद सदस्य, १२ पंचायत समिती सदस्य आणि भंडारा व पवनी या दोन्ही पंचायत समितीमध्ये भाजपचे सभापती असून शिवसेनेकडे केवळ १ जिल्हा परिषद व ३ पंचायत समिती सदस्य आहेत, अशी तुलनात्मक गोषवाराही या पदाधिकाऱ्यांनी सादर केला आहे.
पूर्वीचा पवनी मतदार संघ सेनेकडे असल्याने तिथे आधी भाजपचा विस्तार झाला नसला तरी मागील ८ ते १० वर्षात भाजपने मजबूत पक्षबांधणी केली असून शिवसेना आमदारांच्या व्यवहारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुये भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपला देण्यात यावे, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली आहे. या मुद्यांवरून भाजप आणि शिवसेनेत चांगलेच फाटल्याचे संकेत दिसत असून येत्या निवडणुकीत त्याचे कोणते पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उघडपणे कुणीही बोलत नसले तरी भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तवही जात नाही. ग्राम पंचायतींमध्ये भाजपाचे सर्वाधिक सरपंच असल्याने ही जागा भाजपाच्या वाट्याला आल्यास ती सहज जिंकता येईल, असा युक्तीवाद भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्याकडे केल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र सध्या या मतदार संघाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार करीत असल्याने शिवसेना ही जागा सोडणार नाही. एकंदरीत दोन्ही पक्षाचे पदाधिकारी या जागेवर आपापला दावा करीत आहेत (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP claims on Bhandara assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.