भंडारा जिल्हा परिषद ‘जनपद’वर राज्य निर्मितीच्या ५६ वर्षांनंतरही फेरफार नाही

By Admin | Updated: January 19, 2016 00:21 IST2016-01-19T00:21:33+5:302016-01-19T00:21:33+5:30

मध्य प्रदेशात असलेल्या महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली.

Bhandara Zilla Parishad 'Janpad' has not changed after 56 years of state's formation | भंडारा जिल्हा परिषद ‘जनपद’वर राज्य निर्मितीच्या ५६ वर्षांनंतरही फेरफार नाही

भंडारा जिल्हा परिषद ‘जनपद’वर राज्य निर्मितीच्या ५६ वर्षांनंतरही फेरफार नाही

शहरातील शासकीय जागांवर एमपीचा ताबा!
प्रशांत देसाई भंडारा
मध्य प्रदेशात असलेल्या महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली. याला ५६ वर्षांचा कालावधी लोटला असून येथील शासकीय रेकॉर्डवर अजूनही मध्यप्रदेशातील अस्तित्व आढळून येत आहे. शहरातील जिल्हा परिषदसह अन्य शासकीय जागांच्या कागदपत्रांचे फेरफार झाले नसल्याने आखीवपत्रीका व ७/१२ वर जनपदची नोंद आहे.
भारतातील मध्यराज्य म्हणून मध्यप्रदेशाची ओळख आहे. इंग्रज राजवटीपासून सीपी अ‍ॅन्ड बेरारचे राज्य म्हणून मध्यप्रदेशची ओळख होती. मध्यप्रदेशात महाराष्ट्राचा समावेश होता.
दरम्यान इंग्रजांनी शासकीय जागा किंवा कार्यालयांना ‘जनपद’ असे विशेषनात्मक नामोल्लेख केला होता. तो नामोल्लेख पुर्वापार आजही चालू असल्याचे निदर्शनात येते.
क्षेत्रफळाच्या दृष्टिने अवाढव्य असलेल्या मध्यप्रदेशचे १ मे १९६० मध्ये विभाजन करून महाराष्ट्रला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. राज्याची निर्मिती होवून आता ५६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, इंग्रज किंवा मध्यप्रदेश सरकारने ठेवलेले हे नाव आजही जसेच्या तसे शासकीय कागदपत्रांवर वापरण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्र स्वतंत्र झाला असला तरी, भंडारा येथील शासकीय कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या तीन मोक्याच्या जागांचे फेरफार झाले नसल्याने त्यांच्या आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद व पी. डब्ल्यू. डी व्यवस्थापनाखाली अशी नोंद आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १०० मधील तरतुदीनुसार जनपदकालीन इमारती (जागा) या जिल्हा परिषदला हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत.
परंतु जिल्हा परिषदच्या अधिपत्याखाली असलेल्या जागेच्या नझुल आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद व सरकारी पट्टेदार व पी. डब्ल्यू. डी च्या व्यवस्थापनाखाली राहील अशी नोंद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषदसह तीन जागा
राष्ट्रीय महामार्गावरील नविन जिल्हा परिषद इमारत, जूनी जिल्हा परिषद इमारत, व माजी शासकीय मनरो हायस्कूल व सध्याचे लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत. या जागांच्या नझुल आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद सभा व पी.डब्ल्यू.डी. व्यवस्थापनाखाली अशी नोंद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना घातले साकडे
राज्यची निर्मिती होवून ५६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. आजपर्यंत आखीवपत्रिका किंवा ७/१२ वरील जनपद नोंदीची फेरफार घेण्याबाबत अधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत ठरली. त्यामुळे जि.प.ची इमारत आजही मध्यप्रदेशच्या जनपदवर उभी आहे. कागदपत्रांवरील दुरूस्ती करण्याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या पुढाकारातून मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे पत्रव्यवहार करून साकडे घातले आहे.

जिल्हा परिषद, मनरो शाळा व जिल्हा परिषद जूनी इमारत या शासकीय जागांच्या आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद असे नमुद आहे. जिल्हा परिषद अधिनस्थ जागेवर जनपद ऐवजी जिल्हा परिषद अशी नोंद करून सुधारणा करावी, अशा मागणीचा ठराव सभागृहात पारित करण्यात आला आहे.
-राजेश डोंगरे
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा.

Web Title: Bhandara Zilla Parishad 'Janpad' has not changed after 56 years of state's formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.