Bhandara: अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:59 IST2023-11-21T18:59:00+5:302023-11-21T18:59:35+5:30
Bhandara News: तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला.

Bhandara: अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल
- मोहन भोयर
तुमसर - तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला. १८ नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास हे नृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर गोबरवाही पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे नोंदविण्याची तयारी चालविली आहे.
तुमसर-वाराशिवणी या आंतरराज्य महामार्गावर नाकाडोंगरी येथे मंडईनिमित्त डान्स हंगामा हा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात एका नर्तकीने ग्रुप मधील एका युवकासोबत अश्लील नृत्य केले. नृत्यात युवक व नर्तकी अतिशय अश्लील व किळसवाणा प्रकार करताना दिसत आहेत. नृत्यादरम्यान युवती स्वतःच आपल्या शरीरावरील कपडे काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. नृत्यांमध्ये ते दोघेही इतके बेधुंद झाले की शेवटी ते स्टेजवरून खाली पडले. नृत्यादरम्यान प्रेक्षकही स्टेजवर मोठ्या संख्येने बसलेले दिसत आहेत. एवढेच नाही तर नोटांचे बक्षीस देतानाही दिसत आहेत. कार्यक्रम बघण्याकरिता मध्य प्रदेशातील पुढारीही आले होते, अशी माहिती आहे.
रात्री १० वाजताच्या दरम्यान हा डान्स हंगामा सुरू झाला. अश्लिलता वाढातला लागल्यावर बारा वाजतानंतर महिला प्रेक्षक निघून गेल्यानंतर हे अश्लील नृत्य झाले, अशी माहिती आहे.
कर्तव्यावर नव्हते पोलिस
गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाडोंगरी गाव येते. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्याकरिता दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु रात्री हे दोन्ही पोलिस कार्यक्रम संपण्यापूर्वीच निघून गेले, त्यानंतर हे अश्लील नृत्य येथे झाल्याची माहिती आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती आहे.
गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी गोबरवाहीचे पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, तुमसरचे पोलिस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करीत आहेत. मंगळवारी दुपारी भंडारा विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली. युवतीने स्वतः तो प्रकार केला की तिला असा प्रकार करण्यास कोणी बाध्य केले होते काय याचा तपास पोलिस करीत आहेत.