Bhandara: भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी, सहा गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 22, 2024 20:11 IST2024-07-22T20:09:44+5:302024-07-22T20:11:46+5:30
Heavy Rains in Bhandara District: पवनी तालुक्यातील आसगाव तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा,विरली, राजनी येथे निसर्गाचा प्रकोप झाला. रविवार सायंकाळपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत आसगावात तब्बल २८०.३ मिमी पाऊस बरसला. यात आलेल्या पुराचा शेकडो ग्रामस्थांना फटका बसला.

Bhandara: भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी, सहा गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
भंडारा - पवनी तालुक्यातील आसगाव तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा,विरली, राजनी येथे निसर्गाचा प्रकोप झाला. रविवार सायंकाळपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत आसगावात तब्बल २८०.३ मिमी पाऊस बरसला. यात आलेल्या पुराचा शेकडो ग्रामस्थांना फटका बसला. स्थानिक प्रशासन, जिल्हा शोध व बचाव पथकाच्या चमूने बचाव कार्य सुरू केले आहे. यात ओपारा, राजनी, आसगावसह तिन्ही गावे मिळून एकूण १५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण १३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आसगावमध्ये घरांची संख्या एकूण १२०० पर्यंत असून त्यातील ९०० घरे पाण्याखाली आली. आसगाव येथील बहुतांश घरे आणि दुकाने पाण्याखाली आली आहेत. ज्या शाळेमध्ये दोन दिवसाआधी निर्वासितांना ठेवण्यात आले होते. त्याच शाळेमध्ये दोन ते तीन फूट पाणी असल्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. पुरात जखमी असलेल्या ग्रामस्थांना पवनी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धानशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
दोन गावांचा संपर्क तुटला
आलेल्या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील ओपारा व ढोलसर गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. याशिवाय लाखांदूर व पवनी तालुक्यातील प्रत्येकी १३ गावांकडे जाणार मार्ग बंद झाले आहेत.
गोसेचे ३३ दरवाजे उघडले
पावसामुळे वैनगंगा नदी आणि पवनीजवळील गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे दीड मीटरने तर २० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून ९९९९.६५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.