बाळ विक्री प्रकरण : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; डॉ. वाजपेयीच्या अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:47 IST2026-02-18T19:44:02+5:302026-02-18T19:47:10+5:30
दुसऱ्या बाळाच्या विक्रीचा लवकरच होणार खुलासा : पोलिसांच्या रडारवर पुन्हा नवे आरोपी

Baby selling case: Anticipatory bail application rejected; Dr. Vajpayee's problems increase
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सध्या हा डॉक्टर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, डॉक्टरांकडून सुट्टी मिळताच त्याला अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
डॉ. नितेश वाजपेयी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी, १७फेब्रुवारीला सुनावणी झाली. पोलिसांनी बाजू मांडली, त्यानंतर सत्र न्यायालयाने खटल्याची सुनावणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
दोन दिवसांपूर्वी डॉ. नितेश वाजपेयी याने १५ फेब्रुवारीला सर्जिकल ब्लेडने स्वतःला जखमी करून कटंगी (जि. बालाघाट, म.प्र.) येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. सध्या तो भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांची नावे पुढे आली असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक झालेली लालेश्वरी सादेपाच सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे प्रकरणाचा तपास करत आहेत.
सागर शिक्काही विक्री प्रकरणात मध्यस्त
या टोळीने मागील नोव्हेंबर महिन्यात एका बाळाची विक्री केल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सागर शिक्का हा या विक्री व्यवहारातील मध्यस्त असल्याचे पोलिसांच्या तपासात आले आहे. यामुळे तपासाची दिशा आता सागर शिक्काच्या बयाणावर केंद्रीत झाली आहे. दुसऱ्या बाळाच्या विक्री प्रकरणावरील पडदा लवकरच दूर सारला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
'ते'बाळ तीन महिन्यांचे
पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि सध्या रुग्णालयात उपचारात असलेले ते बाळ १० दिवसांचे नसून तीन महिन्यांचे असल्याचे आता पुढे आले आहे. महिला बाल कल्याण विभागाकडून रेकॉर्डवर बाळाच्या वयाबद्दल १० दिवसांची नोंद झाली होती. मात्र, आता योग्य नोंद घेण्यात आली असून, ते बाळ तीन महिन्यांचे असल्याचे सांगण्यात आले.
सागर शिक्काच्या पोलिस कोठडीत २१ तारखेपर्यंत वाढ
या प्रकरणातील महत्त्वाचा धागा असलेल्या सागर शिक्का यालाही पोलिसांनी १४ फेब्रुवारीला अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार असल्याने त्यालाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याची पोलिस कोठडीची मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.