लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दीड दशकापासून इमानेइतबारे जिल्हा आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या १०२ रुग्णवाहिका चालकांना विनाशर्ती, अटीने कामावर पूर्ववत घ्यावे, ही प्रमुख मागणीसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर नवजीवन रुग्णवाहिका संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभागृहात खासदार सुनील मेंढे, सीईओ विनय मून, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर यांच्याशी चर्चेतून मिळालेल्या आश्वासनानंतर रुग्णवाहिका चालकांनी आंदोलन मागे घेतले.शासकीय रुग्णवाहिका वाहनावर मागील १० ते १५ वर्षांपासून शासनाच्या विविध कार्यप्रणालीने वाहन चालक या पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्तीने रुग्णवाहिका चालक सेवेत कार्यरत होते. राज्य स्तरावरुन या योजनांतर्गत नियुक्ती थांबवून राज्य स्तरावरुन बाह्यस्रोत एजन्सीमार्फत आजतागायत यांनी सेवा दिली. कार्यरत आहेत. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई आयुक्त तथा संचालक यांच्यामार्फत सन २०२२ - २०२३पासून तीन वर्षांकरिता वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट विभागनिहाय विविध संस्थेला दिले आहे. त्यामध्ये वर्ग १०वी पास, उंची १६० से. मी. हे वाहन चालकांसाठी निकष लावून दिले आहेत. १० ते १५ वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या वाहन चालकांवर हे निकष अन्यायकारक आहेत. तसेच यापूर्वी तत्कालीन आयुक्त यांनी मागील वर्षी नेमलेल्या कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारचे शिक्षणाची व उंचीबाबत शर्ती, अटी न ठेवता कार्यरत असलेल्या वाहन चालकांना कर्तव्यावर ठेवण्याबाबतचे कंत्राट देतानाच आदेशित केले होते. त्यामुळे विद्यमान रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली नाही. आजपर्यंत सेवेत कार्यरत असताना आता हा अन्याय का? असा प्रश्न या रुग्णवाहिका चालकांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निवड समितीमार्फत ११ महिन्यांच्या नियुक्ती आदेशानुसार दोन ते अडीच वर्षे सेवा व त्यानंतर राज्य स्तरावरुन नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सेवा दिली. परंतु आयुक्त यांनी नवनियुक्त कंत्राटदाराला दिलेले १५ फेब्रुवारी २०२२मधील वर्कऑर्डरमधील निकष हे अन्यायकारक आहेत. पूर्वीप्रमाणे कामावर ठेवण्यात यावे, याबाबतचे निर्देश देण्यात यावे, अन्यथा परिवारासह आत्महत्या करू, असा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे. विष प्राशन, जलसमाधी घेऊन प्राणज्योत संपविण्याशिवाय दुसरे कोणतेही साधन राहणार नाही.