दिलीराम कवडू वाघाये (५०) रा. केसलवाडा (वाघ) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी स्नेहा वाघाये हिचा विवाह २१ एप्रिल रोजी आयोजित आहे. त्यासाठी नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी ते पत्नी संगीता (४५) यांच्यासोबत शनिवारी सकाळी केसलवाडावरून निघाले. लाखनी येथे पेट्रोल भरून केसलवाडा (राघोर्ते), किटाळी, पालांदूर, पेंढरी या गावांना मुलीच्या लग्नपत्रिका वितरित करण्यासाठी जाण्याचे नियोजन होते. राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळण घेत असताना भंडाराकडून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक आरजे ०४ जीए ८३२२ ने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दिलीराम जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेली पत्नी संगीता गंभीर जखमी झाली. या अपघाताचे वृत्त माहित होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संगीताला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुलीच्या लग्नाचा आनंद सोहळ्याची तयारी करताना वडिलांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.