रामाला नाचणी प्रिय का? याचे उत्तर मिळते संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' काव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:32 PM2024-04-19T15:32:02+5:302024-04-19T15:35:05+5:30

एकादशीला तांदूळ खात नाही हे माहीत होते, पण विष्णुरूप रामाला नाचणी आवडत होती, हे तुम्हीदेखील पहिल्यांदाच ऐकत असाल तर वाचा ही गोष्ट!

Why does Rama love ragi? The answer to this is found in Sant Kanakdas' poem 'Ramdhanyacharitra'! | रामाला नाचणी प्रिय का? याचे उत्तर मिळते संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' काव्यात!

रामाला नाचणी प्रिय का? याचे उत्तर मिळते संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' काव्यात!

समाज माध्यमावर माहितीचा पूर लोटलेला असतो. अशातच काही गोष्टी तर्कशास्त्राला धरून असतात तर काही बिनबुडाच्या. काही विषय चिंतनाचे ठरतात तर काही चिंतेचे! अशातच राम नवमीच्या काळात निनामी सदर गोष्ट वाचण्यात आली. तर्कसुसंगत असल्याने शिवाय संतांचे आणि त्यांच्या काव्याचे नाव नमूद केल्याने त्याबद्दल चिंतन करावेसे वाटले. नाचणीचे महत्त्व वेगळे सांगायला नको, पण त्याच्याशी रामकथा जोडली गेल्याने तिचे महत्त्व अधिकच वधारले असे म्हणता येईल. 

आता रामाचे आवडते धान्य कुठले ?,
याचं उत्तर दडलंय एका भांडणात.

चला तर मग बघुया काय आहे हे भांडण.

भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. 

राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, "या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे." 

हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली. "म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ. आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते.""मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ." 

हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. "मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते."

शब्दाने शब्द वाढत जातो. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडते. राम म्हणतात की "मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे." 

राम अयोध्येला निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते. ६ महिन्यांनी जेव्हा राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात. तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते. नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते. 

हे बघून प्रभुराम म्हणतात. "तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली." म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात. 

या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं.

मित्रांनो तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' या काव्यात सांगितलेली आहे. 

माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंग रूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून केली पाहिजे. हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळते...

Web Title: Why does Rama love ragi? The answer to this is found in Sant Kanakdas' poem 'Ramdhanyacharitra'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.