२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:26 IST2026-01-14T10:25:49+5:302026-01-14T10:26:30+5:30
Shree Ganesh Jayanti 2026 Maghi Ganpati Ganeshotsav: माघ महिन्यातील विनायक चतुर्थी, श्री गणेश जयंतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जाणून घ्या...

२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
Maghi Ganesh Jayanti 2026 Date: गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे, प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले असून, अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षातील माघ महिना सुरू होईल. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा, शुभ आणि विशेष मानला जातो. माघ महिन्यात अनेक व्रते, सण-उत्सव साजरी केली जातात. माघ महिन्यातील अनेक तिथींना अनन्य साधारण असेच महत्त्व आहे. पैकी शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघी गणेश जयंती, माघी गणेशोत्सव २०२६ या वर्षांत कधी आहे? माघी श्री गणेश जयंती २०२६ चे महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी.
विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी गणेश व्रत
महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत. यात अष्टविनायकांची स्थाने प्रमुख होत. पेशवाईत गणेशोपासनेचा संप्रदाय अधिक वाढला. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून फार महत्त्व दिले. त्यामुळे भाद्रपदातील गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गणेश स्थापनेच्या वेळेस व विसर्जनाच्या वेळेस प्रचंड मिरवणुका निघतात. गणपतीची प्रिय तिथी चतुर्थी असून शुक्लपक्षातील चतुर्थीस ‘विनायकी’ व कृष्णपक्षातील चतुर्थीस ‘संकष्टी’ म्हणतात. या दोन्ही दिवशी गणेशव्रत सांगितले असून महाराष्ट्रात अनेक जण त्याचे विधियुक्त पालन करतात.
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
२०२६ च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती
मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. २०२६ च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गुरुवार, २२ जानेवारी २०२५ रोजी श्री गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते.
माघी गणेश जयंती तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर, माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
माघी विनायक चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती.
श्रीगणपतीचे, विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव -पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक, महोत्कट विनायक. या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेधपणे जगता येईल, अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे सांगितले जाते.
माघी गणेशोत्सवाची दीर्घ परंपरा
भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. ठाण्याला सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. नौपाड्यातील उमा नीळकंठ व्यायामशाळेतील नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळ अमृत महोत्सव साजरा करत आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९३१ साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारणपणे १२० ते १२२ सार्वजनिक तसेच ५०० ते ६०० घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥