Mahashivratri 2026 Importance: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे.
महाशिवरात्रीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. देशभरात शेकडो शिवमंदिरे असून, या सर्व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री पर्व साजरे केले जाते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला
शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. पार्वतीसारख्या लोकोत्तर विश्वसुंदरीबरोबर जगावेगळा संसार करतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते.
महाशिवरात्रीबाबत शिव महापुराणात कथा
शिवपुराणात महाशिवरात्रीसंदर्भात एक कथा आढळून येते. सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनहार श्रीविष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला. दोघांचे भांडण सुरू असताना, त्यांच्यासमोर एक महाकाय अग्निस्तंभ प्रकटला. या अग्निस्तंभाचे तेज पाहून दोघे जण स्तिमित झाले. प्रकटलेल्या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी विष्णू देवांनी वराह रुप, तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रुप धारण केले. काही केल्या या दोघांचा त्याचा आदि-अंत समजेना. अखेर त्या अग्निस्तंभातून शिवशंकर प्रकट झाले. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महादेव हे ग्रामदैवत
भारतात शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते. अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहे. त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरतात.
समुद्र मंथन आणि बिल्वपत्राची कथा
पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा आढळून येते. यानुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले. या विषामुळे भूमीवरील जीव-जंतूंचा मृत्यू होऊ लागला. यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले. यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला. यावरून शंकराला नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली. शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले. त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून, शंकरावर पाण्याचा अभिषेक केला. यामुळे शंकराचे डोके शांत झाले. बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो.
महाशिवरात्रीचे महात्म्य ‘श्रीशिवलीलामृत’ ग्रंथात
‘श्रीशिवलीलामृत’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीचे माहात्म्य सांगताना शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठमोठे पर्वणीकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र- स्तोत्रपठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो. गंधर्व, ऋषिमुनी हे सर्व शिवरात्रीव्रत करतात, असा निर्वाळा दिला आहे. शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे, शंकराची उपासना सर्वत्र वाढावी, अशा सद्हेतूने हे महिमान सांगितले जाते. शिवलीलामृतातील अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे. शैव मताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीलामृताला बरेच महत्त्व आहे. हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे हे खरेच. ग्रंथाची भाषा सुबोध आहे. त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत.
महाशिवरात्रीचे प्रकार अन् २०२६चा निशीथकाल मुहूर्त
नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते. महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. यंदा २०२६ मध्ये १५ फेब्रुवारीच्या उत्तररात्री १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १८ मिनिटे या कालावधीत निशीथकाल आहे.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : Mahashivratri, observed on Magh Vadya Chaturdashi, is holier than monthly Shivratris. It's celebrated with temple visits, pujas, and fasting. The festival marks Shiva's earthly manifestation and is associated with the Samudra Manthan legend, emphasizing Shiva's role as protector and destroyer of evil.
Web Summary : माघ वद्य चतुर्दशी पर मनाई जाने वाली महाशिवरात्रि, मासिक शिवरात्रियों से अधिक पवित्र है। यह मंदिर दर्शन, पूजा और उपवास के साथ मनाई जाती है। यह त्योहार शिव के पार्थिव अभिव्यक्ति का प्रतीक है और समुद्र मंथन की किंवदंती से जुड़ा है, जो शिव की रक्षक और बुराई के विनाशक के रूप में भूमिका पर जोर देता है।