मन शांत ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? वाचा भगवान बुद्धांची शिकवण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 05:38 PM2024-02-01T17:38:11+5:302024-02-01T17:38:51+5:30

अशांत मन शांत कसे ठेवायचे हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. 

What exactly should be done to keep the mind calm? Read the teachings of Lord Buddha! | मन शांत ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? वाचा भगवान बुद्धांची शिकवण!

मन शांत ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? वाचा भगवान बुद्धांची शिकवण!

भगवान बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, 'पूर्णा.' त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, 'भगवान, आता आपण मला अनुज्ञा द्या. मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.'

भगवान म्हणाले, 'ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे. जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना 
आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.'

भगवान म्हणाले, 'अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे! तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.'

भगवान म्हणाले, 'समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.'

भगवान म्हणाले, 'तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहकून गेलो असतो.'

यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले, 'पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस. कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.'

भगवान महावीरांच्या बाबतीत असे सांगतात, की ते काट्यावरूनही अनवाणी चालू शकत असत. कारण, ते चालताना काटे आपली वर असलेली टोके खाली करत असत. महंमद पैगंबरांच्या बाबतीतही म्हटले जाते, वाळवंटातून प्रखर उन्हात चालत असताना त्यांच्या डोक्यावर नेहमी एक ढग सावली धरत असे. 
उलटे होणारे काटे व सावली धरणारा ढग यांच्यावर विश्वास ठेवणे कदाचित अवघड वाटेल. परंतु, एक मात्र नक्की, ज्याच्या मनात काटे नाहीत, त्याच्या पायांना काटे टोचणार नाहीत आणि ज्याच्या हृदयात जळणारी वासना नसेल, त्याला उन्हाच्या कडाक्यातही सर्वत्र सावली असल्याचा भास होईल. 

एकूणच काय, तर सर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते. ती जोपर्यंत शांत असते, तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. 

Web Title: What exactly should be done to keep the mind calm? Read the teachings of Lord Buddha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.