सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी समजून घ्यायचीय? मामासाहेब देशपांडे यांचे ग्रंथ ठरतील उपयोगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:30 PM2024-04-03T12:30:02+5:302024-04-03T12:30:26+5:30

श्रीज्ञानेश्वरीचे थोर अभ्यासक सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज पुण्यतिथी; त्यानिमित्त त्यांच्या ग्रंथांचा आणि कार्याचा थोडक्यात आढावा!

Want to understand Dnyaneshwari in simple terms? Mamasaheb Deshpande's books will be useful! | सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी समजून घ्यायचीय? मामासाहेब देशपांडे यांचे ग्रंथ ठरतील उपयोगी!

सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी समजून घ्यायचीय? मामासाहेब देशपांडे यांचे ग्रंथ ठरतील उपयोगी!

>> रोहन विजय उपळेकर 

‘‘आई, श्री ज्ञानेश्वर माउली ‘पायाळू’ हा शब्द आपल्या वाङ्मयात खूप वेळा योजतात. ‘पायाळू’ चा नेमका अर्थ काय गं ?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो ? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात श्रीसद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच 'पायाळू' !’’ असा सद्गुरु श्री माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्‍या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.सद्गुरु पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प.पू.योगिराज सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, दि.३ एप्रिल २०२४ रोजी प.पू.श्री.मामांची ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्वरी अभ्यासकाच्या दैवी चरित्र आणि कार्याचा हा अल्प परिचय.

प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्‍वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. श्री माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. सद्गुरु श्री माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दान् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केल्याने ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला सद्गुरु श्री माउलींचा दासानुदास मानीत होता. त्यांची अभ्यासू वृत्ती शेवटच्या क्षणापर्यंत ताजी होती. म्हणूनच श्री माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता !

प.पू.श्री.मामांचा जन्म पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच अंशाने झाला. आषाढ शुद्ध द्वितीया, दि.२५ जून १९१४ रोजी प.पू.दत्तोपंत व प.पू.सौ.पार्वतीदेवी देशपांडे या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी प.पू.श्री.मामा जन्मले. त्यांना सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींकडून सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेची शक्तिपातदीक्षा लाभली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान श्रीपंढरीनाथांचा सगुणसाक्षात्कार झाला. पुढे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडून १९५४ साली शक्तिपातपूर्वक मंत्रदीक्षा आणि लेखी पत्राद्वारे दीक्षाधिकारही त्यांना लाभले. त्यांच्यावर भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचीही पूर्णकृपा होती. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे नाथ-दत्त-भागवत या तिन्ही संप्रदायांचे थोर अध्वर्यू ठरले.

प.पू.श्री.मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत हजारो प्रवचनांच्या माध्यमातून श्री माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनी देखील ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला, संतविचारांच्या आधारे प्रत्यक्ष उपासनेला सुरुवात केली.

श्री.मामासाहेब तरुणपणी भैरवनाथ तालमीचे वस्ताद असून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होते. यशवंतराव चव्हाण त्यांचे त्या काळातले सहकारी. १९३० साली एका मोर्च्यादरम्यान पुण्यातील सिटी पोस्ट चौकात हॅमंड नावाच्या इन्स्पेक्टरने मारलेली गोळी उंच उडी मारून शिताफीने चुकवल्याबद्दल मामासाहेबांचा केसरीमधून गौरव झाला होता.

प.पू.श्री.मामा हे उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व देखील होते. त्यांनी श्री माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच काही वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत-नाटक मराठी रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते. प.पू.श्री.मामांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये चित्तरंजन कोल्हटकर आदी उत्तम नटवर्यांनी काम केलेले आहे.

श्री माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत श्री माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. प.पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टी देखील श्री माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. सद्गुरु श्री माउलींना नेमके काय म्हणायचे आहे ? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्‍या सहाव्या अध्यायातील 'अभ्यासयोगा'वर प.पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. आचार्य अत्रे, धुंडामहाराज देगलूरकर आदी थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी त्यांना ‘ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. 

श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू असणारे प.पू.श्री.मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते, पण तेच जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून प.पू.श्री.मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशना’ची स्थापन करून श्री माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास ग्रंथांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस अडीचशे पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करून त्यांची सवलतीच्या दरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून ख्याती पावलेली आहे. श्री माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा त्यांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.

फाल्गुन कृष्ण नवमी, मंगळवार दि.२१ मार्च १९९० रोजी पहाटे तीन वाजता पूर्वसूचना देऊन प.पू.श्री.मामा श्रीदत्तब्रह्मी लीन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या 'श्रीपाद सेवा मंडळ' या धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शांनुसार आजमितीस महान कार्य संपन्न होत आहे. पाच वर्षांपूर्वी ब्रह्मलीन झालेल्या प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व सध्या कार्यरत असणारे प्राचार्य प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या प.पू.श्री.मामासाहेबांच्या दोन्ही उत्तराधिकाऱ्यांनी मंडळाचे कार्य जगभर पोचवलेले आहे.

संपर्क : 8888904481

Web Title: Want to understand Dnyaneshwari in simple terms? Mamasaheb Deshpande's books will be useful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.