१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:07 IST2025-12-29T07:07:07+5:302025-12-29T07:07:07+5:30
Vinayak Chaturthi And Sankashti Chaturthi in 2026 Date List: जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या संपूर्ण वर्षात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तिथी कधी येणार आहेत? सविस्तर माहिती एका क्लिकवर जाणून घ्या...

१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
Vinayak Chaturthi And Sankashti Chaturthi in 2026 Date List: प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्। भक्तवासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये॥ गणपती बाप्पाचे केवळ नाव ऐकले मात्र तरी मनात चैतन्य संचारते. सकारात्मकता लाभते. गणपतीचे महात्म्य, महती वर्णावी तेवढी कमीच आहे. मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. २०२६ च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या संपूर्ण वर्षांत कधी विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत असेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. याच गणपतीची प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी आणि वद्य चतुर्थी या तिथींना विशेष उपासना, व्रत केले जाते.
२०२६ वर्षाच्या सुरुवातीला आणि सांगतेला संकष्ट चतुर्थी तिथी
कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते. प्रथमेश गणपतीचे शुभाशिर्वाद लाभले की, सर्व विघ्न दूर होऊन यश, प्रगती, सुख, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. इंग्रजी नववर्ष २०२६ ची सुरुवात होत आहे. अनेकार्थाने २०२६ हे वर्ष विशेष, वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. २०२६ हे वर्ष ऊर्जेचे वर्ष असल्याचे म्हटले जात आहे. २०२६ या नववर्षाची पहिली चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी आहे आणि विशेष म्हणजे पौष महिन्यातील या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. २०२६ च्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ, विशेष आणि पुण्याचे मानले गेले आहे. तसेच २०२६ मध्ये असा एक महिना आहे, त्यात तीन वेळा चतुर्थी तिथींचा योग जुळून आलेला आहे. तसेच २०२६ या वर्षाची सुरुवात आणि सांगता संकष्ट चतुर्थीने होणार आहे.
विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी या व्रतांमध्ये नेमका फरक काय?
अबालवृद्धांच्या लाडक्या बाप्पाच्या उपासनेत चतुर्थीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्य दर्शनाला महत्त्व असते. तर प्रत्येक मराठी मासातील वद्य चतुर्थीला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्र दर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.
२०२६ मध्ये दोन चतुर्थी तिथी अधिक असणार
प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. यंदा, २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे. त्यामुळे दोन चतुर्थी तिथी वाढणार आहेत. विशेष म्हणजे अधिक ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे पुण्याचे मानले गेले आहे.
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या संपूर्ण वर्षांत येणाऱ्या चतुर्थी
जानेवारी महिना २०२६
- पौष महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी (अंगारक योग) - मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे.
- माघ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - गुरुवार, २२ जानेवारी २०२६ - श्री गणेश जयंती, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी.
फेब्रुवारी महिना २०२६
- माघ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे.
- फाल्गुन महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६.
मार्च महिना २०२६
- फाल्गुन महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, ०६ मार्च २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे.
- चैत्र महिना (मराठी नववर्ष) शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - रविवार, २२ मार्च २०२६.
एप्रिल महिना २०२६
- चैत्र महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - रविवार, ०५ एप्रिल २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे.
- वैशाख महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - सोमवार, २० एप्रिल २०२६.
मे महिना २०२६
- वैशाख महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, ०५ मे २०२६ - चंद्रोदय रात्रौ १० वाजून १९ मिनिटे.
- अधिक ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, १९ मे २०२६.
जून महिना २०२६
- अधिक ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - बुधवार, ०३ जून २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे.
- निज ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - गुरुवार, १८ जून २०२६ - गुरुपुष्यामृत योग.
जुलै महिना २०२६
- निज ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, ०३ जुलै २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे.
- आषाढ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शुक्रवार, १७ जुलै २०२६.
ऑगस्ट महिना २०२६
- आषाढ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे.
- श्रावण महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - रविवार, १६ ऑगस्ट २०२६ - नाग-चतुर्थी उपवास - दूर्वागणपती व्रत.
- श्रावण महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे.
सप्टेंबर महिना २०२६
- भाद्रपद महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ - श्रीगणेश चतुर्थी (गणेशोत्सव) - पार्थिव गणपती पूजन. चंद्रदर्शन निषेध - चंद्रास्त रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे.
- भाद्रपद महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०८ वाजून १४ मिनिटे.
ऑक्टोबर महिना २०२६
- अश्विन महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६.
- अश्विन महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे - दाशरथी चतुर्थी - करक चतुर्थी.
नोव्हेंबर महिना २०२६
- कार्तिक महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६.
- कार्तिक महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे.
डिसेंबर महिना २०२६
- मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - रविवार, १३ डिसेंबर २०२६.
- मार्गशीर्ष महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शनिवार, २६ डिसेंबर २०२६ - चंद्रोदय रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥