Vinayak Chaturthi: ४०० वर्षांपूर्वीचे बाप्पाचे मदनमदोत्कट मंदिर; चतुर्थीला साकारले जाते मोदकाचे शिलारूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:29 IST2025-03-03T17:29:04+5:302025-03-03T17:29:30+5:30

Vinayak Chaturthi 2025: आज विनायक चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया नाशिक शहरातील ४०० वर्षापूर्वीचे दशभुजा मदनमदोत्कट गणपती मंदिराबद्दल!

Vinayak Chaturthi 2025: 400 year old Madanmadotkat Temple of lord Ganesha; make modaka ganesh idol on every chaturthy | Vinayak Chaturthi: ४०० वर्षांपूर्वीचे बाप्पाचे मदनमदोत्कट मंदिर; चतुर्थीला साकारले जाते मोदकाचे शिलारूप!

Vinayak Chaturthi: ४०० वर्षांपूर्वीचे बाप्पाचे मदनमदोत्कट मंदिर; चतुर्थीला साकारले जाते मोदकाचे शिलारूप!

>> जय रमेश कोढीलकर

मंदिराचे शहर म्हणून नाशिकचा सर्वदूर लौकिक आहे. केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक सुप्रसिद्ध अशी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदीरे प्रसिद्धीच्या फार झोतात नसली तरी त्यांचे प्राचीनत्व त्या मंदिरांची श्रीमंती वाढवते. 

जुन्या नाशकातील गोदावरी नदीच्या तीरावर नाव दरवाजाजवळील हिंगणे वाड्यात, हे  ४०० वर्षांचे मदनमदोत्कट गणेशाचे मंदिर पुरातन सिद्ध स्थान आहे.
गणेश पुराणांतील उपासना खंडात या मदनमदोत्कट गणेशाचे वर्णन आहे. अतिशय प्रसन्न रूप असलेला हा मदन मदोत्कट नवसाला पावणारा देव असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.

हिंगणे हे पेशव्यांचे उपाध्याय म्हणजेच पुरोहित होते. पेशव्यांचे उपाध्याय असलेल्या हिंगणेच्या स्वप्नात येऊन गणपती बाप्पानी आपल्या घरात माझी प्राण प्रतिष्ठापना करावी अशी आज्ञा केली मग ही गणरायाची मूर्ती गोदावरी नदीच्या तीरावरून हिंगणेच्या वाड्यात पाठीवर बालक बसून जसे नेतात त्या पद्धतीने नेण्यात आले आणि त्याच स्वरूपात पाठीवरून गणराय उतरत आहे अश्या पद्धतीने मूर्तीचे रूप आजही आहे.

या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना माधवराव पेशव्यांच्या सांगण्यावरून त्याचे नाशिक मधील उपाध्याय विष्णुपंत हिंगणेच्या वाड्यातच करण्यात आली आहे. मदनमदोत्कट गणेशाच्या स्थापनेसाठी दगडी गाभारा बांधण्यात आला आलेला आहे. या मूर्तीचा उल्लेख असणारा पुरातन शिलालेख हिंगणे वाड्याच्या भिंतीवर दिसतो. त्यावर कोरलेली अक्षरे प्राचिनतेची साक्ष देतात. 

एकदा भगवान शंकर  कैलास पर्वतावर तपश्चर्येला बसले असताना त्यांची तपश्चर्या मदनाने भंग केली. भगवान शंकरानी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला व मदनाला जाळून भस्म केले.  मदनाची पत्नी रती हिने भगवान शंकराची विनवणी करून उ:शाप मागितला. त्यानुसार रतीने २१ चतुर्थीचे व्रत केले. श्री गणेशाची कठोर उपासना केली. चतुर्थीला उद्यापनाच्या वेळेला रतीने मोदकांचा पार बांधून आराधना केली. त्यानंतर भगवान शंकराने साक्षात्कार दिला. आणि ह्या मोदकांच्या पारातून स्वयंभू श्री गणपती प्रकट झाले म्हणून ह्या गणपतीला मदनमदोत्कट असे नाव पडले अशी आख्यायिका व संदर्भ सापडतात. आजही मोदकाच्या आकाराचे शिलारुप मोदक मदनमदोत्कट गणपती जवळ सापडतात. 

सततच्या शेंदूर लेपनामुळे गणपतीवर शेंदरी कवच निर्माण होऊन मूळ स्वरूप झाकले गेले होते. दिनांक ३० एप्रिल २००६ रोजी  अक्षय तृतीयाच्या दिवशी मंदिरातील व्यवस्था पाहणारे व नित्य पूजा अर्चा करणाऱ्या हिंगणे परिवाराकडून शेंदरी थराचे पडणारे पापुद्रे दूर केल्यावर मूळ दशभुजा गणेशाचे रुप समोर आले. (फोटो मध्ये दिसणारे रूप)

हे शेंदराचे थर काढून टाकल्यावर अंत्यत सुबक चेहरा, दहा हात, व एखाद्या तेजस्वी बालकांप्रमाणे आसनस्थ मूर्तीचे स्वरूप आकर्षित करणारे ठरले.
ही गणेशाची मूर्ती बाल स्वरूपातील आहे. पाय खाली सोडून व हात गुढघ्यावर ठेवलेले दिसतात. हा मदन मदोत्कट गणेश डाव्या सोंडेचा आहे. मंदिरात प्राचीन अश्या दोन पितळाच्या मोठ्या समई गणेशा जवळ दिसतात.

हिंगणे वाड्यात अलीकडच्या काळापर्यंत मोदकाच्या आकाराचे दगड सापडत होते. भक्तगण ते गणरायाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने घरी नेत व देवघरात ठेवत. मदन मदोत्कट गणपती हा हिंगणे घराण्याचा कुलदैवत आहे. मूर्तीला शुद्ध तुपातून शेंदूर लावण्याची येथे परंपरा आहे. हिंगणेच्या वाड्यात असल्यामुळे  मदन मदोत्कट गणपती  हिंगणेचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

मदनमदोत्कट गणपतीचे दर्शन करण्यासाठी गोदावरी नदीच्या तीरावर रोकडोबा मारूती जवळून किंवा मोदकेश्वर गणपती मंदिराच्या मागील गल्लीतुन हिंगणे वाड्यात जाता येईल.

Web Title: Vinayak Chaturthi 2025: 400 year old Madanmadotkat Temple of lord Ganesha; make modaka ganesh idol on every chaturthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.