Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:05 IST2025-06-09T11:05:01+5:302025-06-09T11:05:47+5:30
Vat Purnima 2025 Puja Vidhi: १० जून रोजी वट पौर्णिमा आहे, पूजेच्या सामानाची तयारी कराल तेव्हा एका कागदावर आठवणीने हा श्लोक लिहून घ्या आणि पुजा झाल्यावर म्हणा.

Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
वटपौर्णिमा हे व्रत पूर्वी तीन दिवसांचे असे. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. यात दोन पक्ष आहेत. एक अमावस्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष. अमावस्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावस्या धरून आधीचे तीन दिवस हे व्रत करतात. तर पौर्णिमा पक्ष मानणाने बहुसंख्य लोक आजकाल एकाच दिवसाचे व्रत करतात. आजच्या काळात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. यंदा १० जून रोजी वटपौर्णिमा(Vat Purnima 2025) आहे.
या व्रताची व्रत कथा अशी, की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली, म्हणून त्याने तिचे नाव 'सावित्री'च ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वत: वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वरसंशोधनासाठी निघाली.
यथाकाळ शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले. शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारदमुनींना अपार दु:ख झाले. कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे, हे ते जाणून होते. हे विधीलिखित त्यांनी राजाला सांगितले. त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला.
Vat Purnima Mehndi Designs: वटपौर्णिमेसाठी खास मेहेंदी डिझाइन्स, हातावर खुलणारा रंग आणि नात्यातला वाढता गोडवा...
मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली. त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगिकारली. सासू-सासरे तसेच पतीची सेवा करू लागली. त्यात एक वर्ष पूर्ण होत आले. वर्षाअखेरीस चार दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढ निश्चयाने `त्रिरात्र सावित्री व्रत' केले. शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला.
नेमक्या त्याचवेळी यमदूत त्याच प्राण हरण करण्यास तेथे पोहोचले. मात्र सावित्रीच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत. सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला. दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला. सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली. शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले. त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर द्यमत्सेनाला दृष्टी आणि राज्य परत मिळाले.
सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. हाच आदर्श ठेवून आजही सुवासिनी आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात.
ही पूजा करताना पूजेबरोबरच पुढील श्लोक आवर्जून म्हणावा-
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
तसेच -
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
ही एकार्थी शिव पार्वतीची पूजा आहे. त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी ती प्रार्थना असते.