Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:55 IST2024-05-21T14:53:18+5:302024-05-21T14:55:16+5:30
Vaishakh Purnima 2024: हिंदू धर्मात वैशाख स्नानाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व वैशाख पौर्णिमेला आहे, त्यादिवशी कोणी कोणते दान करावे ते जाणून घ्या!

Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
यंदा वैशाख पौर्णिमा २३ मे रोजी येत आहे. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केला जातो. या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि राशीनुसार ज्योतिष शास्त्राने सुचवलेले दान करावे असे सांगितले जाते.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार पुढीलप्रमाणे दान करा :
मेष - या राशीच्या लोकांनी या दिवशी जल दान करावे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जल दान करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही. यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जल व्यवस्था, पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा छोटासा हौद बांधून घेऊ शकता.
वृषभ - या राशीच्या लोकांनी आगामी पावासाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला, बूट, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करावे.
मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करावे.
कर्क - या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करावी. तसेच कोणाला आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारावे. उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूची कृपा कायम राहते, असे मानले जाते.
सिंह - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे, न शिजवलेले धान्य दान करणे हे विशेष फलदायी ठरते. दान देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होतात.
कन्या - कन्या राशीचे लोक अनाथाश्रम किंवा बालआश्रमात शैक्षणिक उपयोगी गोष्टी दान करू शकतात. उदा., वह्या-पुस्तक तसेच पंखा, कुलर किंवा धान्याचे दानही शुभ सिद्ध होईल.
तूळ - या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावावीत. अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे.
वृश्चिक - या दिवशी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते.
धनु - या राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करणे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांची तहान भागवल्याने तुमच्याही जीवनात गारवा कायम राहील.
मकर - या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
कुंभ - वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरजूंना सुती कपडे दान करावे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.
मीन - या राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी. किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करावे.