अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:59 IST2025-05-22T08:58:47+5:302025-05-22T08:59:52+5:30
Vaishakh Apara Ekadashi May 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: अपरा एकादशी कधी आहे? या दिवशी व्रताचरण कसे करावे? नेमके काय करू नये? जाणून घ्या...

अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
Vaishakh Apara Ekadashi May 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: शांताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम् । विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् । वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ वैशाख महिन्याची आता सांगता होणार आहे. वैशाख महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी अपरा एकादशी नावाने ओळखली जाते. या व्रताची फलनिष्पत्ती पापनाश आणि जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे परिमार्जन अशी सांगितली आहे. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अपरा एकादशीचे महात्म्य, महत्त्व, शुभ मुहूर्त, व्रत पूजनाचा सोपा विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. अपरा एकादशी पुण्यफलदायी आहे, असे शास्त्र सांगते. श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते.
अपरा एकादशी: शुक्रवार, २३ मे २०२५
वैशाख वद्य एकादशी प्रारंभ: गुरुवार, २२ मे २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून १२ मिनिटे.
वैशाख वद्य एकादशी समाप्ती: शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी रात्रौ १० वाजून ३० मिनिटे.
भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वैशाख वद्य अपरा एकादशीचे व्रताचरण शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी करावे, असे सांगितले जाते. अपरा एकादशी दिनी करण्यात येणाऱ्या गंगा स्नानाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
अपरा एकादशीचा सोपा व्रत पूजा विधी
अपरा एकादशी व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे.
अपरा एकादशीचे पारण कसे करावे?
अपरा एकादशीला जागरण करून भजन, कीर्तनात रात्र जागवावी, असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.