Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:01 IST2025-11-01T15:41:15+5:302025-11-01T16:01:45+5:30
Tulasi Vivah 2025: कार्तिकी एकादशीपासून तुलसी विवाहाला सुरुवात होईल, हा विधी का करावा? त्याचे लाभ काय आणि कशी तयारी करावी? सविस्तर वाचा.

Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी
यंदा २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी(Kartiki Ekadashi 2025) आहे आणि चातुर्मासाची(Chaturmas 2025) समाप्ती! या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि त्यांच्या उपस्थितीत शुभ कार्याची सुरुवात होते. तुळशी विवाह हा या शुभ कार्याची नांदी ठरतो. हा केवळ विधी नाही तर ही एक पूजा, उपासना आहे, व्रत आहे. त्याचे लाभ काय आणि हा विवाह कधी आणि कसा करावा ते जाणून घेऊ.
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात. यंदा २ ते ५ नोव्हेंबर तुळशी विवाह(Tulasi Vivah Date 2025) सोहळा रंगणार आहे, त्यानिमित्त सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तुळशी विवाहाची आख्यायिका(Story Behind Tulasi Vivah Ritual)
जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.
तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व(Reason Behind Tulasi Vivah)
तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.
तुळसी विवाहाचे महत्त्व(Importance of Tulasi Vivah)
- विवाह संबंधी अडथळे दूर: ज्या लोकांच्या विवाहात किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील, त्यांचे दोष तुळशी विवाह केल्याने दूर होतात आणि लवकर विवाहयोग जुळून येतात.
- अखंड सौभाग्य: विवाहित महिलांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्यांना अखंड सौभाग्य लाभते.
- कन्यादानाचे पुण्य: ज्यांना कन्या नाही किंवा ज्यांना कन्यादान करण्याची इच्छा आहे, त्यांना तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते.
- सुख-समृद्धी: तुळशी ही लक्ष्मीचे रूप मानली जाते, तर शाळीग्राम हे विष्णूंचे. त्यामुळे हे लग्न लावल्यास घरात सुख, शांती, धन आणि समृद्धी नांदते.
- चातुर्मास समाप्ती: तुळशी विवाह करून चातुर्मासाची (Chaturmas) सांगता केली जाते. यानंतर सर्व शुभ कार्य (उदा. लग्न, मुंज) पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळते.
- रोगप्रतिकारशक्ती: तुळशीची पूजा केल्याने आणि तिचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते आणि घरातील आरोग्य चांगले राहते, कारण तुळशीचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहेत.
- मोक्षप्राप्ती: धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.
तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी :
तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या साहित्यामध्ये प्रामुख्याने तुळशीचे वृंदावन (किंवा तुळशीचे रोप), शाळीग्राम (भगवान विष्णूंचे प्रतीक) किंवा विष्णू-कृष्णाची मूर्ती लागते. पूजेसाठी नवीन वस्त्र (तुळशीला नेसविण्यासाठी साडी/ओढणी आणि शाळीग्रामसाठी धोतर), तसेच तुळशीला श्रृंगार करण्यासाठी लागणारे साहित्य जसे की बांगड्या, काजळ, टिकली, हळद-कुंकू, आणि मंगळसूत्र यांचा समावेश असतो.
विवाह विधीसाठी: शुभ्र अक्षता, गोड धोड्यांची माळ, हळदीचे पाच गाठे, आणि यज्ञोपवीत (जानवे) लागते.
पूजेसाठी पंचामृत, चंदन, तुपाचा दिवा (निरंजन), धूप, आणि विड्याची पाने (खराब न झालेली नागवेलीची पाने), सुपारी, नारळ, कापूस, आणि देवाला अर्पण करण्यासाठी नैवेद्य (उदा. साखर, गूळ, मिठाई) आवश्यक असतो.
विवाहातील मुख्य विधीसाठी कापसाची वस्त्रे (बारीक कापूस), आले (अद्रक) आणि ऊस हे महत्त्वाचे साहित्य आहे, कारण लग्नाचे मंडप किंवा वेदी उसाने सजवली जाते. समारंभाच्या शेवटी प्रसाद वाटण्यासाठी पेढे किंवा लाडू तयार ठेवावेत.
तुळशी विवाहाची पद्धत : (Tulasi Vivah Vidhi)
कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वरील दिवशी तिचे लग्न लावतात. यंदा २-५ नोव्हेंबर या कालावधीत गोरज मुहूर्तावर अर्थात सूर्यास्ताच्या वेळी तुळशी विवाह करायचा आहे.
विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. एकादशीला अनेकांचा उपवास असल्याने द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली आहे.
तुळशीची आरती : (Tulasi Vivah Aarti)
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी।
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।