Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाला तुळस आणि विष्णुंना बेल वाहिला जातो; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 07:00 IST2025-11-05T07:00:00+5:302025-11-05T07:00:02+5:30
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमेला खर्या अर्थाने चातुर्मासाची सांगता होऊन सगळे देव आपापला पदभार हाती घेतात, म्हणून या दिवसाचे अनोखे वैशिष्ट्य जाणून घ्या!

Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाला तुळस आणि विष्णुंना बेल वाहिला जातो; पण का?
वैकुंठ चर्तुदशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा(Tripuri Purnima 2025) या नावे साजरा केला जातो. यंदा ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा(Kartik Purnima 2025) ही तिथी विभागून आली आहे. मात्र पौर्णिमा तिथी ५ नोव्हेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने त्रिपुरी पौर्णिमा ५ तारखेला साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली.
चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभाराची सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली. त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहा:कार माजवत होता. ब्रह्मदेवांकडू वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता. त्या नियंत्रणात आणण्यासाठी, नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे पारिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली. तसेच चार मासांचा कार्यकाल संपवून, वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हाती सोपवून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केले. हरी-हराची ही भेट अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नर नारी या दोहोंचे स्मरण करून बेल, तुळस वाहील, श्रद्धेन प्रार्थना करेल, त्याला मरणोत्तर वैकुंठप्राप्ती होईल, असा आशीर्वाद महादेवांनी दिला. म्हणून वैकुंठ चर्तुदशी पाठोपाठ त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखेच जल्लोषाने साजरे केले जातात. देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणूनही साजरा केला जातो.
त्रिपुरी पौर्णिमेला चार्तुमासाची सांगता होते. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडातरी अंधार दूर व्हावा, ही दीपदानामागील सद्भावना असते.
प्रबोधिनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.