आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:29 IST2025-07-31T16:27:32+5:302025-07-31T16:29:02+5:30
सकाळी केलेली ही छोटीशी पूजा तुमचा दिवस प्रसन्न ठेवेल, त्यासाठी आज अन्नपूर्णेचे नाव घ्या आणि शेगडी पूजन सुरु करा.

आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
श्रावण(Shravan 2025) शुद्ध सप्तमीला शितला सप्तमीचे व्रत केले जाते. यादिवशी देवी अन्नपूर्णा हीची पूजा करून चक्क शिळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गृहिणीला विश्रांती आणि शिळ्या अन्नाचा आदर या दोन गोष्टी त्यातून साध्य होतात. भारतात अनेक ठिकाणी अनेक नावांनी हे व्रत केले जाते. त्यानिमित्ताने आज आपण एका उपासनेबद्दल जाणून घेऊ, जी केवळ शितला सप्तमीला नाही तर कायमस्वरूपी करता येते. ती कशी करावी आणि त्यामुळे कोणता लाभ होतो ते अनघा जोग यांच्या एका व्हायरल पोस्टवरून जाणून घेऊया.
काही वर्षांपूर्वी "स्वयंपाक करताना, करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील स्पंदने अन्नात उतरतात" अशा आशयाचा एक लेख वाचला होता. कालच तो माझ्या एका दुसऱ्या ग्रूप वर पुनः वाचला गेला आणि मी थेट साधारण ९९ च्या काळात पोचले.
मुलगी लहान असल्याने, आणि ऑफिस कामाच्या वेळा ऑड असल्याने, घरात पूर्णवेळ एक मदतनीस ठेवली होती. मला सकाळी सव्वासहाच्या सुमारास घर सोडावं लागे आणि म्हणून साडेचार वाजता उठावच लागे. तर ही मदतनीस, माझ्याही आधी म्हणजे पावणेचारच्या सुमारास उठून, सकाळी केर ,फरशी स्वतःची आंघोळ उरकून, किचन मध्ये आलेली असायची. गॅसच्या शेगडीखाली सुरेख रांगोळी घालून, त्यावर हळदीकुंकू वाही, मग शेगडीलाही हळदीकुंकवाची बोटं लावी. त्यानंतर, लगेचच जवळच असलेल्या खिडकीत,एक निरांजन आणि उदबत्ती लावी. शेगडीला मनोभावे हात जोडून,मगच दूध तापवण, चहाच आधण ठेवण,कुकर लावणं इत्यादी कामाचा झपाटा सुरु करी. सकाळी साडेचारला मी उठुन किचन मध्ये गेले की इतकं प्रसन्न वाटायचं की अहाहा! दिवसाची सुरवातच मुळी एका सुरेख नोटवर होई. आजच्यासारखी फोटो काढायची सुविधा हाताशी नव्हती म्हणून फोटो नाहीयेत त्यावेळचे ....
आधीच्या मदतनीस मुलीं/बायका यांच्या अनुभवांच्या तुलनेत, हा अनुभव खूपच छान होता आणि मला स्वतःला समृद्धही करणारा होता.
काही दिवसांनी या मुलीचं लग्न झालं आणि स्वैपाकाची काही जबाबदारी आपसूक माझ्यावर आली. नेमकी माझीही ऑफिसचीही वेळ त्या दरम्यान बदलली. साडेसातला घरातून बाहेर पडून चालत असे. त्यामुळे, हाताशी अख्खी 75 मिनिट जास्तीची मिळाली. या मुलींमुळे घरात सुरू झालेली ही चांगली प्रथा, हातात मिळलेल्या अतिरिक्त वेळेमुळेही, मीपुढे चालू ठेवू शकले ... आणि आता तर रिटायर्ड असल्याने वेळच वेळ आहे !! त्यामुळे आजपर्यंत हे सुरू आहे.
सकाळी उठल्यावर, स्वतःच आवरून झालं की किचन मध्ये येऊन, गॅसच्या शेगडीखाली रांगोळी रेखायची, रांगोळी आणि शेगडीला हळदकुंकू वाहायच, निरांजन,उदबत्ती लावायची आणि अन्नपूर्णा स्तोत्र लावून स्वैपाकाचा श्रीगणेशा करायचा.....काही वर्षांपूर्वी, हौसेने छोटं जातं, पाटा वरवंटा, दोन छोटे खलबत्ते आणले आणि सकाळी, गॅस शेगडी बरोबरीने त्यांनाही हळदीकुंकू वाहते.
कोणतीही चांगली गोष्ट आपण ज्या व्यक्तीकडून किंवा जिच्यामुळे शिकतो, ती आपली गुरु असतेच, भले मग ती आपली मदतनीस का असेना!
आशा प्रकारे, ही मदतनीस मुलगी माझी गुरू झाली आणि कायम राहील...अगदी आजन्म !!
काही घरात चूल पूजनाची पद्धत आहे, आणि खूप गृहिणी हे करतही असतील पण जर करत नसतील, आणि कोणाला ही पद्धत आवडली आणि पटली, तर, सवड काढून, सुरवात करायला हरकत नाही. अगदी शुभस्य शीघ्रम...प्रसन्न मनानी, एकीकडे अन्नपूर्णा स्तोत्र ऐकत जर स्वैपाक झाला तर स्वैपाकाचा मूळ उद्देश आणि रुचिमधील फरक याची प्रत्यक्षच अनुभूती घेता येईल.
प्रत्येक घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यात हातभार लावणारी ही छोटीशी पण आशयपूर्ण अशी ही आपली जुनीच प्रथा या निमित्ताने वाढीला लागेल, इतकाच प्रामाणिक हेतू हा लेख लिहिण्यामागे आहे .... तसेही, घराबाहेर किंवा देवघरातील कुठल्याही छोट्याश्या रांगोळीवर सहज नजर गेली, तरी मनातले नकारात्मक विचार आपोआपच गळून जाऊन, सात्विकतेने भारून जातात हा अनेकांचा अनुभव आहे.
मग तुम्हीसुद्धा करताय ना सुरुवात?