पुरणपोळीचा गोडवा आणि आयुष्यात विविध रंग भरणाऱ्या फाल्गुन मासाची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:25 IST2022-03-02T17:25:03+5:302022-03-02T17:25:37+5:30

फाल्गुन हा श्रीकृष्ण आणि गोपिकांचाही आवडता महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात जुने हेवे दावे विसरून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते.

The sweetness of Puranpoli and the beginning of Falgun Masa which fills life with different colors! | पुरणपोळीचा गोडवा आणि आयुष्यात विविध रंग भरणाऱ्या फाल्गुन मासाची सुरुवात!

पुरणपोळीचा गोडवा आणि आयुष्यात विविध रंग भरणाऱ्या फाल्गुन मासाची सुरुवात!

हिंदू पंचांगानुसार चैत्र-वैशाखादी मासगणनेतील फाल्गुन हा शेवटचा बारावा महिना! या महिन्यात होळी, धुलिवंदन हे सण वगळता अन्य कोणतेही सण, व्रते येत नाहीत, तसेच कोणतेही शुभकार्य करत नाहीत, म्हणून अडगळीसारखा वाटणाऱ्या या मासाला 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे उपरोधिकपणे म्हटले जाते. कारण, या मासामुळे शुभकार्य खोळंबतात. तसे असले तरी फाल्गुन मास आपल्या सर्वांनाच अनेक कारणांमुळे आवडतो. यंदा ३ मार्च २०२२ पासून फाल्गुन मास सुरू होत आहे. 

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. 

हा शिशिर ऋतूचा दुसरा महिना असून या महिन्यात उत्तरायण असते. या महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी मन्वादि आहेत. मन्वादि तिथी म्हणजे ज्या तिथीला सृष्टीचा पुन: आरंभ झाला असे मानले जाते, त्याला मन्वंतर किंवा मन्वादि तिथी असे म्हणतात. या तिथीला शिव आणि शक्तीची विशेष उपासना केली जाते. 

दक्षिण भारतात फाल्गुन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवळांमध्ये लहान-मोठे सर्व उत्सव फाल्गुन महिन्यात केले जातात. तसेच फाल्गुन महिन्यात येणारा होळी-रंगपंचमी-धुळवड हा सण सबंध देशात उत्साहाने साजरा केला जातो. वाईट विचार, आचार यांचे होलिकेत दहन करून नव्या रंगात, नव्या उत्साहात पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. 

गोकुळात असताना भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रंगपंचमी खेळल्यामुळे या उत्सवाला धार्मिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्यादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाच्या प्रेमरंगात रंगलेल्या गोपिका रंगपंचमीला श्रीकृष्णाशी रंगोत्सव खेळतात. तोच उत्साह सर्व वयोगटातील लोकांमध्ये आजही दिसून येतो. मनातील अढी सोडून सगळे जण एका रंगात रंगून जातात.

असा हा फाल्गुन पुरणपोळीचा गोडवा देणारा, विविध रंगांनी आयुष्य रंगवून टाकणारा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज करणारा महिना आहे. 

Web Title: The sweetness of Puranpoli and the beginning of Falgun Masa which fills life with different colors!

टॅग्स :Holiहोळी