नेहमी सेवातत्पर असणार्‍या हनुमानाची सुप्त स्थितीतील मूर्ति उलगडते महाभारतात दडलेली कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 07:05 IST2025-02-08T07:00:00+5:302025-02-08T07:05:01+5:30

झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये, पण का? महाभारतात सापडते त्याचे कारण; कसे ते पहा!

The dormant statue of Hanuman, who is always ready to serve, reveals the story hidden in the Mahabharata! | नेहमी सेवातत्पर असणार्‍या हनुमानाची सुप्त स्थितीतील मूर्ति उलगडते महाभारतात दडलेली कथा!

नेहमी सेवातत्पर असणार्‍या हनुमानाची सुप्त स्थितीतील मूर्ति उलगडते महाभारतात दडलेली कथा!

काही प्रचलित समजुतींमागचे कारण जाणून न घेताही आपण पालन करतो, त्यामागे सद्हेतू असणार हा भाव ठेवून आपण त्या करतो. जसे की रात्री केस कापू नये, नखे कापू नये, केर काढू नये, झाडांना हात लावू नये इ. त्यामागे निश्चितच काही ना काही कारणे आहेत, परंतु ती जाणून न घेता केवळ अंधानुकरण करणे योग्य नाही. एखाद्या कृतीमागे असलेला हेतू कळला तर ज्ञानात तर भर पडतेच शिवाय आपण जे करतो, वागतो ते समजून उमजून केल्याने आनंद दुणावतो. अशाच कृतींपैकी एक म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये! आता ही केवळ प्रथा आहे की त्यामागे काही कारण, चला जाणून घेऊ. 

काही गोष्टींचा संबंध थेट पौराणिक कथांशी जोडला जातो. ते विचार तर्क सुसंगत असतील तर पटतातही. काही पौराणिक कथा या रूपकात्मक असल्याने त्यातून मनुष्याने बोध घ्यावा हा हेतू असतो. झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये हे सांगण्यामागे महाभारताच्या कथेशी संबंध जोडण्यात आला आहे. ती कथा आणि त्याच्याशी संबंधित तर्क पडताळून पाहू. 

महाभारतात काय सांगितले आहे?

महाभारताच्या कथेनुसार, भीमाचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमंताला आज्ञा दिली. हनुमंतांनी वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या शेपटीने भीमाचा मार्ग अडवला. आपले शरीर थकल्याने आपल्याला हलताडुलता येत नाही, त्यामुळे तूच मदत कर असे हनुमंतांनी भीमाला सांगितले. भीमाची वाट अडवल्याने त्याला वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला. पण काही केल्या त्याला तसे करणे शक्य होईना. हनुमंताने पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेव असे सांगितले. भीमाने तसे केले पण त्याला तेही जमले नाही. तेव्हा हे वानर असाधारण व्यक्तिमत्त्व असल्याचे भीमाला कळून आले आणि त्याचे गर्वहरण झाले. 

भीम त्या वानराला शरण आला आणि हनुमंताने आपले रूप टाकले आणि मूळ रूप प्रगट केले. ते पाहता भीम हनुमंतासमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या अहंकाराची कबुली दिली. त्यावर हनुमंत म्हणाले, 'भीमा आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुबळे समजण्याची चूक करू नये. शिवाय एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, वैचारिक रित्या ओलांडून जाणे हा तिचा अपमान आहे हे लक्षात ठेवावे. म्हणून व्यक्ती झोपलेली असली, वयाने लहान असली तरी तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे, हे लक्षात घेऊन तिला ओलांडण्याची चूक करू नये!'

हनुमंताचे हे बोलणे ऐकून भीमाने ही खूणगाठ बांधली आणि त्यानंतर तो कधीच कोणाला ओलांडून गेला नाही. त्याने आपला अनुभव आपल्या भावंडाना सांगितला, त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचे अनुकरण लोक करू लागले व ती प्रथा बनत गेली. 

अशा रीतीने ही पौराणिक कथा या रीतीमागची पार्श्वभूमी तर सांगतेच शिवाय त्यामागच्या तर्काचाही खुलासा करते. त्यामुळे यापुढे झोपलेली व्यक्ती पाहिल्यावर तिला ओलांडून तर जाऊ नयेच, शिवाय तिचा आदर का करावा हेही लक्षात ठेवावे!

Web Title: The dormant statue of Hanuman, who is always ready to serve, reveals the story hidden in the Mahabharata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.