नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:55 IST2025-08-19T15:47:48+5:302025-08-19T15:55:07+5:30
Swami Swarupanand Smaran 2025: स्वामी स्वरुपानंद यांचा स्मरण दिन आहे. समग्र चरित्राविषयी अगदी थोडक्यात जाणून घ्या...

नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
Swami Swarupanand Smaran 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास काळ सुरू आहे. श्रावण महिन्याची सांगता आता होत आहे. अवघ्या काही दिवसांनी अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. श्रावणाची सांगत होण्यापूर्वी प्रदोष, शेवटचा श्रावणी गुरुवार, शेवटचा श्रावणी शुक्रवार आहे. गुरुवारी चातुर्मासातील दुसरा गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. महाराष्ट्रात अनेक संत-महंत, थोर पुरुष, दैवी परंपरा असणारे सत्पुरुष होऊन गेले. यापैकीच एक म्हणजे पावसचे स्वामी स्वरुपानंद. श्रावण कृष्ण द्वादशीला स्वामींची पुण्यतिथी असते. यंदा २०२५ मध्ये बुधवार, २० ऑगस्ट रोजी स्वामी स्वरुपानंदांची पुण्यतिथी आहे.
भगवद्गीतेतील विभूतियोगात भगवंतांनी सांगितलेल्या 'मासानांमार्गशीर्षोऽहम्' अशा मार्गशीर्ष महिन्यात वद्य द्वादशीला १५ डिसेंबर १९०३ रोजी स्वामींचा जन्म झाला. घरात सर्वांचे लाडके असणारे स्वामी आजोबा, आई-वडील, काका-काकू यांच्या कृपाछत्राखाली मोठे होत होते. आजोबांचे शिक्षणाकडे असणारे काटेकोर लक्ष, आईची शिस्त, घरी येणारे विद्वान पाहुणे यांच्यामुळे सर्व भावंडांची उत्तम प्रगती होत होती. लहानपणापासूनच स्वामींची बुद्धी तल्लख होती. स्वामींचे खरे नाव रामचंद्र विष्णू गोडबोले होते. परंतु ते आप्पा किंवा रामभाऊ या नावाने लोकप्रिय होते.
विरक्ती अन् सद्गुरू कृपेची ओढ
त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. सन १९१९ मध्ये ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर पुण्याच्या टिळक महाविद्यालयात वाङ्मयविशारद पदवी प्राप्त केली. ज्ञानार्जनाची मुळात आवड असल्यामुळे ज्ञानप्राप्तीची एकही संधी ते सोडत नसत. कालांतराने महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले. राष्ट्रोद्धारासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखून स्वरूपानंद यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा सुरू केली. त्यातून तरुणांना विविध प्रकारचे स्वावलंबासाठी उपयुक्त असे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, अशातच स्वामींना विरक्ती निर्माण झाली अन् सद्गुरू कृपेची ओढ, आस लागली.
संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून गुरूंना अर्पण
सद्गुरूभेटीसाठी मन इतके अधीर झाले होते की, स्वामींना कशातच राम दिसत नव्हता. सद्गुरू कृपेची लागलेली ओढ पाहून मामा केशवराव गोखले यांनी रामभाऊंना पुणे येथील श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांच्याकडे नेले. सन १९२३ मध्ये त्यांनी बाबा महाराजांचा अनुग्रह घेतला व त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले. अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून गुरूंना अर्पण केली. संस्कृत गीतेतील मूळ ७०० श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली आणि स्वामी स्वरुपानंदांनी सोपेपणाने २० हजार ओव्यामध्ये अभंग ज्ञानेश्वरी रचली.
स्वामी समर्थांची कृपा अन् पावसमध्ये ४० वर्षे वास्तव्य
तरुणपणी पुण्यात विद्याभ्यास करीत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने भाग घेतलेला होता. परंतु भगवंतांच्याच प्रेरणेने पुढे ते सर्व सोडून रत्नागिरी जवळ पावस येथे येऊन राहिले. येथेच त्यांचे सलग चाळीस वर्षे वास्तव्य होते. स्वामी स्वरुपानंदांवर राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचीही कृपा होती. स्वामी स्वरूपानंद हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष होते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ग्रंथांचा सुलभ अभंगानुवाद केलेला स्वामी स्वरुपानंदांनी केलेला असून, त्यांचे ते सर्व ग्रंथ खूप लोकप्रिय झाले. अत्यंत मार्मिक व सुरेख अशा अभंगरचना 'संजीवनी गाथा' नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत.
मी राम, मी कृष्ण, मी साईबाबा, अक्कलकोटचे महाराज मी
स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते. "स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां ॥" असा आपला स्वानुभव ते मांडतात. आपल्या नाथ सांप्रदायिक साधनेचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात, "स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥" त्यांची 'संजीवनी गाथा' साधकांसाठी खरेखरी 'संजीवनी'च आहे, असे म्हटले जाते. मी राम, मी कृष्ण, साईबाबा तो मी, अक्कलकोटचे महाराज ते मीच जे कृष्णमुर्ती तो, मी असे स्वामी म्हणाले. संत दिसती वेगळाले परि स्वरुपी एकची जाहले, याची प्रचिती या शब्दांवरुन येते.
स्वामींच्या शिकवणीवर विश्वास अन् अनुयायांचा वाढता परिवार
देह ठेवण्यापूर्वी तीन दिवस स्वामी समाधी अवस्थेत होते. तत्पूर्वी स्वामींची वहिनी, पुतणे, देसाई परिवार, सत्यदेव सरस्वती, माधवनाथ भेटीला आले. स्वामीभक्तांची रिघ लागली. देसाईकुटुंबात ज्यांना अनुग्रह दिला नव्हता, त्या साऱ्यांना परंपरा देऊन सोऽहंम प्रतिक्रिया सांगावी, असे स्वामींनी सांगितले. श्रीस्वामींनी श्रावण कृष्ण द्वादशीला म्हणजेच १५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस येथे देह ठेवला. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मंदिराच्या सुंदर परिसरात, ध्यानगुंफा (चिंतन कक्ष) आणि एमिलियाचे झाड आहे. स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे मंदिर ट्रस्टने उत्तम राखले आहे. मंदिर विश्वस्त, स्वामींचे जन्मदिवस, गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव साजरे करतात. केवळ रत्नागिरीतीलच नव्हे तर भारतातील सर्व भागातील अनेक अनुयायी स्वामींच्या शिकवणींवर विश्वास ठेवतात. सर्व भक्तांसाठी स्वामींनी प्रतिज्ञापत्र करुन ठेवले आहे.
हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका अहो,
आजकालचे नव्हेच आम्ही ।।
माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं ।
दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं ।
आता आम्हाला नाही कुठं जायचं ।
इथंच आनंदात रहायंच ।।
आणि
माऊलीनंच अन्यत्र पाठवलं ।
आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं ।
तरी आता चैतन्य स्वरुपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच
हरि ॐ तत् सत्