स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:43 IST2026-03-20T12:42:48+5:302026-03-20T12:43:42+5:30
Swami Samarth: प्रत्येक स्वामी भक्ताला वाटते, आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी, पण ती अगोदरच झाली आहे, हे कसे ओळखायचे ते आज स्वामी प्रगट दिनानिमित्त जाणून घ्या.

स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!
आज २० मार्च २०२६, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन(Swami Samartha Prakat Din 2026) सर्वत्र 'स्वामी समर्थ' नामाचा जयघोष सुरू आहे. पण या मंगलदिनी अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो की, "इतकी सेवा करूनही स्वामींची माझ्यावर कृपा आहे का? ती कशी ओळखावी?"
संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, 'आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयालागी'. याचाच अर्थ असा की, सद्गुरू आपल्या शिष्याला वेळ न घालवता स्वतःसारखेच तेजस्वी बनवतात. आजच्या या शुभ मुहूर्तावर, स्वामींची कृपा झाली आहे हे ओळखण्याच्या काही 'अंतर्गत खुणा' आपण या लेखातून जाणून घेऊया.
स्वामींची कृपा झाली आहे हे कसे ओळखावे?
१. भीतीचा अभाव आणि अढळ विश्वास
जेव्हा तुमच्या मनात "कुणीतरी माझ्यासोबत सतत आहे, मी एकटा नाही" ही भावना दृढ होते, तेव्हा समजावे की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. संकटे आली तरी मन विचलित न होता शांत राहते आणि तुमच्या प्रयत्नांबरोबरच "स्वामी बघून घेतील" हा विश्वास तुम्हाला मार्ग दाखवतो, हेच कृपेचे पहिले लक्षण आहे.
२. देहबोली आणि स्वभावात बदल
स्वामींची कृपा केवळ मठात नसते, ती तुमच्या वागण्यातून दिसते. जर तुमच्यातील अहंकार कमी झाला असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी होत असेल आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागत असाल, तर स्वामी तुमच्यातच वास करत आहेत. दोन तास पूजा करून जर माणसांशी वाईट वागत असाल, तर ती भक्ती पोकळ आहे.
३. कर्तव्याप्रती जागरुकता
अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म म्हणजे संसार सोडणे. पण खरी गुरुकृपा माणसाला उत्तम 'संसार' करायला शिकवते. मुलांचे शिक्षण, धन-संपत्तीचा योग्य विनियोग आणि कुटुंबाप्रती आपली कर्तव्ये पार पाडण्याची जाणीव होणे, ही स्वामींचीच कृपा आहे.
४. नामस्मरणाची ओढ
जेव्हा तुम्हाला सांगून नाही, तर ओढीने नामस्मरण करावेसे वाटते; जेव्हा ८:२३ ची ट्रेन चुकली तरी चालेल पण दर्शनासाठी मन व्याकुळ होते, तेव्हा समजावे की स्वामींनी तुम्हाला आपल्या छत्रछायेत घेतले आहे.
५. प्रसादापेक्षा 'प्रसारा'ची ओढ
एक चांगला भक्त केवळ स्वतःसाठी प्रसाद आणत नाही, तर तो ज्ञानाचा प्रसार करतो. जर तुम्हाला स्वामींचे विचार, पोथी किंवा ग्रंथ इतरांना वाटावेसे वाटत असतील, जेणेकरून त्यांनाही हा मार्ग गवसावा, तर तुमची भक्ती 'सोळा नंबरी सोन्यासारखी' झाली आहे असे समजावे.
गुरुकृपा: एक सुखद अनुभव : "गुरुकृपा म्हणजे थेट भेट—ह्या मनाची त्या मनाशी, ह्या हृदयाची त्या हृदयाला!"
जेव्हा तुम्हाला समाधानाची शांत झोप लागते, जेव्हा भविष्याची अनामिक भीती उरत नाही आणि जेव्हा तुमची ओंजळ भरलेली नसली तरी मन तृप्त असते, तेव्हा समजावे की स्वामींचा वरदहस्त तुमच्या पाठीवर आहे. एकदा का त्यांचे बोट धरले की, मग आपण आपले राहतच नाही; ते नेतील तिथे आणि करतील ते, या विश्वासाने आयुष्य मार्गस्थ होते.
आजच्या प्रकट दिनी स्वतःला एकच प्रश्न विचारा— "मी स्वामींच्या आज्ञेत आहे का?" जर उत्तर 'हो' असेल, तर खात्री बाळगा, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत!
