१६ फेब्रुवारी २०२६ रोजी सोमवती अमावास्येचा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे. मात्र, जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि त्याच दिवशी सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी 'पंचक' देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा अमावास्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.
सोमवती अमावास्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभ फळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. परंतु, यंदा १६ फेब्रुवारीला जोडून ग्रहण तसेच पंचक सुरु होत असल्याने काही विशिष्ट कामे करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
सोमवती अमावास्या, ग्रहण आणि पंचक काळात 'या' चुका टाळा:
१. नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार:
नवीन व्यावसायिक करार किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे. पंचकात सुरू केलेली कामे अनेकदा पाच वेळा करावी लागतात किंवा त्यात अडथळे येतात, असे मानले जाते. तसेच अमावस्या, ग्रहण या तिथी शुभ कार्यासाठी वर्ज्य मानल्या जातात.
२. घर बांधणी किंवा दुरुस्तीची कामे:
या काळात लाकूड गोळा करणे, घराचे छत (धाबा) टाकणे किंवा घराच्या दुरुस्तीचे काम सुरू करू नये. यामुळे वास्तूदोषाची भीती असते आणि घराचे नुकसान होण्याची शक्यता असते.
३. दक्षिण दिशेला प्रवास:
या काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे, कारण ही दिशा यमदेवाची मानली जाते. विशेषतः अमावास्येच्या दिवशी हा प्रवास अधिक त्रासदायक ठरू शकतो.
४. पलंग किंवा गादी खरेदी:
शास्त्रांनुसार, या काळात खाट, पलंग किंवा गादी खरेदी करणे किंवा तयार करणे वर्ज्य आहे. असे केल्याने कुटुंबात आजारपण किंवा मानसिक अशांती येऊ शकते.
५. वादात पडणे आणि नकारात्मक विचार:
अमावास्येला चंद्र क्षीण असतो, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशात पंचकाचा प्रभाव सुरू झाल्यावर कोणाशीही वाद घालू नका. चिडचिड केल्याने तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात.
६. कोणाकडूनही कर्ज घेणे किंवा देणे:
या दिवशी पैशांची देवाणघेवाण केल्यास ते पैसे परत मिळण्यास खूप कष्ट पडतात. या काळात केलेले व्यवहार दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता असते.
७. तुळशीची पाने तोडणे किंवा झाडे कापणे:
अमावास्येला आणि पंचकात कोणत्याही झाडाला इजा पोहोचवू नका. तुळशीची पाने तोडणे देखील महापाप मानले जाते. पूजेसाठी आदल्याच दिवशी पाने तोडून ठेवावीत.
शुभ परिणाम मिळवण्यासाठी काय करावे?
सकाळी ९ वाजेपूर्वी स्नान आणि दान उरकून घ्यावे.
पितरांच्या नावाने तर्पण किंवा अन्नदान करणे अत्यंत फलदायी ठरेल.
'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करा, ज्यामुळे अमावस्यां, ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही.
Web Summary : Somvati Amavasya on February 16, 2026, coincides with a solar eclipse and Panchak. Avoid new ventures, construction, south travel, and financial dealings. Donate before 9 am, offer Tarpan, and chant 'Om Namah Shivaya' for positive results.
Web Summary : 16 फरवरी, 2026 को सोमवती अमावस्या, सूर्य ग्रहण और पंचक के साथ है। नए काम, निर्माण, दक्षिण यात्रा और वित्तीय लेन-देन से बचें। सुबह 9 बजे से पहले दान करें, तर्पण करें और सकारात्मक परिणामों के लिए 'ओम नमः शिवाय' का जाप करें।