जानेवारीत दुसरा शुक्र प्रदोष २०२६: व्रताचरणाने पुण्य-फल, शिवपूजनाने सुख-लाभ; ‘हे’ मंत्र म्हणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:56 IST2026-01-29T14:53:16+5:302026-01-29T14:56:07+5:30
Shukra Pradosh Vrat January 2026: जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा प्रदोष व्रत आले आहे. शुक्र प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रतात शिव पूजन कसे करावे? कोणते मंत्र उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या...

जानेवारीत दुसरा शुक्र प्रदोष २०२६: व्रताचरणाने पुण्य-फल, शिवपूजनाने सुख-लाभ; ‘हे’ मंत्र म्हणा!
Shukra Pradosh Vrat January 2026: सन २०२६ च्या पहिल्या जानेवारी महिन्याची सांगता होत आहे. जानेवारी २०२६ महिना संपताना महादेवांना समर्पित असलेले प्रदोष व्रत आहे. विशेष म्हणजे या जानेवारी महिन्यात तीन वेळा प्रदोष व्रत आले. नववर्ष २०२६ ची सुरुवात होतानाच प्रदोष व्रत होते. यानंतर जानेवारी महिन्याच्या मध्यावर प्रदोष व्रत आले आणि आता जानेवारी महिन्याची सांगता होताना प्रदोष व्रत आले आहे. तसेच जानेवारी महिन्यातील हे दुसरे शुक्र प्रदोष व्रत आहे. शुक्र प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रतात शिव पूजन कसे करावे? कोणते मंत्र उपयुक्त ठरू शकतील? जाणून घेऊया...
प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. प्रदोष व्रताची पूजा सायंकाळी केली जाते. तिन्हीसांजेला, दिवेलागणीला प्रदोष काळी प्रदोष व्रताचरण आणि पूजन करावे, असे सांगितले जाते. शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी शुक्र प्रदोष व्रत आहे.
सर्व दोषातून मुक्त करणारे प्रदोष व्रत
सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
शुक्र प्रदोष व्रत म्हणजे नेमके काय?
कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शुक्र प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. शुक्रवारी प्रदोष येत असल्यामुळे याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. शुक्र प्रदोष या दिवशी महादेवांसोबत शुक्र ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करावी, असे सांगितले जाते.
प्रदोष व्रतात शिव पूजन विधी
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. सूर्यास्तानंतर स्नानादी कार्ये उरकून प्रदोषाचे व्रताचरण करावे. षोडषोपचार पद्धतीने शिवपूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने शक्य नसेल, तर पंचोपचाने महादेव पूजन करावी. महादेवांवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर जलाभिषेक, शक्य असेल तर रुद्राभिषेक करावा. व्रत-पूजनावेळी अन्य काही नसल्यास बेलपत्र आवर्जून अर्पण करावे. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. महादेवांची आरती करावी आणि या व्रताची कहाणी ऐकावी किंवा त्याचे पठण करावे, असे सांगितले जाते. प्रसादाचे वाटप करून मनापासून शंकराला नमस्कार करावा. शिव पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते.
प्रदोष व्रतात जप करायचे अत्यंत प्रभावी शिव मंत्र
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नम:।।
।। श्री शंकराय नम:।।
।। श्री महेश्वराय नम:।।
।। श्री सांबसदाशिवाय नम:।।
।। श्री रुद्राय नम:।।
।। ॐ पार्वतीपतये नम:।।
।। ॐ नमो नीलकण्ठाय नम:।।
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
शुक्र ग्रहाशी संबंधित मंत्र जप, उपाय उपयुक्त
शुक्र प्रदोष व्रत शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे शुक्र संदर्भातील दोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. शिव उपासनेमुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होऊ शकतो, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, शुक्र ग्रहाचे काही दोष असतील, तर त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥, हा शुक्राचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे. ॥ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:॥, हा शुक्राचा बीज मंत्र असल्याचे सांगितले जाते. ॥ॐ अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात्॥, ॥ॐ रजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमहि तन्नो शुक्र: प्रचोदयात्॥, हे दोन शुक्राचे गायत्री मंत्र आहेत. कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र दान करावे. शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे, असे काही उपाय सांगितले जातात.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥