स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:20 IST2026-04-03T15:18:14+5:302026-04-03T15:20:55+5:30

Shridhar Swami Punyatithi 2026: समर्थ परंपरेतील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधर स्वामी महाराज.

shridhar swami maharaj punyatithi 2026 who was a powerful propagator of the sect and was given darshan by samarth ramdas swami and adya shankaracharya | स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!

स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!

Shridhar Swami Punyatithi 2026: मनुष्याने आपल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व त्याने मंगलमय नित्यानंदस्वरूपी परमपवित्र परमानंदरूपी भगवंताला जाणून घ्यावे. तो सत्यस्वरूपी आहे. अशा भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे. हे विश्व हीच एक सुखाची प्रयोगशाळा आहे. प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपडत असतो. भगवंताला जाणण्यासाठीच एक उपाय म्हणजे ‘आत्मज्ञान’ होय. समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली । जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।  जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा । मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।।, असे समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधर स्वामी महाराज. शनिवार, ०४ एप्रिल २०२६ रोजी श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे. 

७ डिसेंबर १९०८ रोजी दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी लाड-चिंचोळी येथे स्वामीजींचा जन्म झाला. मुलाचे नांव श्रीधर असे ठेवण्यात आले. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कीर्तन श्रवण व व्यायाम अशा गोष्टींमध्ये श्रीधर स्वामींना रुची होती. वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी त्यांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांची श्रीरामावर श्रद्धा बसली होती. लौकिक दृष्टीने शालेय विद्याभ्यासाबरोबर वैदिक धर्मकर्माचाही अभ्यास ते करीत असत.

सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी जीवन समर्पित

नातेवाईकांकडे राहून श्रीधर स्वामींनी प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. विद्यार्थी व शिक्षकात अतिशय प्रिय होते. देशासाठी, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करण्याचे बीज याच काळात त्यांच्या मनात खोलवर रूजले गेले. भारतीय आर्य संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे यावर त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदासांचे चरित्र वाचून त्यांनी केलेल्या तपासारखे तप आपणही करावे असे त्यांना वाटू लागले. सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी जीवन समर्पित करावयाचे असे त्यांनी ठरविले होते.

समर्थांचे दर्शन अन् ३२ वर्ष धर्म प्रचाराचे अविरत कार्य

सन १९२७ च्या नवरात्रात दसरा दिवशी सीमोल्लंघन करून ते तपासाठी पुणे सोडून सज्जनगडावर पोहोचले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचे व श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचे दर्शन घेतले. जप, तप, सेवा, अभ्यास, दासबोध वाचन, करूणाष्टके पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ असे. १९३० च्या दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थांचे दर्शन झाले. श्री समर्थांच्या आज्ञेने गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून, जंगलातून गोकर्ण-महाबळेश्वरला गेले. शिवानंद योगी व स्वामींची भेट झाली. अतूट नाते निर्माण झाले. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तप, साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. सन १९३५ चे सुमारास ते पुन्हा गडावर  आले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले. स्वामीजींनी संन्यास धारण केल्यानंतर एकंदर ३२ वर्षे सतत धर्मप्रचाराचे कार्य केले.

श्रीधरबुवा हे ‘श्रीधरस्वामी’ म्हणून प्रसिद्धीस पावले

सन १९४१ मध्ये शिवानंदस्वामींनी देह ठेवल्यावर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी पाहिली. मठाचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. आता श्रीधरबुवा हे ‘श्रीधरस्वामी’ म्हणून प्रसिद्धीस पावले. श्रीधर स्वामींच्या प्रतिभासंपन्नतेने ते अनेकांचे श्रद्धास्थान बनले. समर्थांनी प्रत्यक्ष दर्शनात श्रीधर स्वामींना “भगवान” म्हणून संबोधिले होते, असे म्हटले जाते. समर्थांची ३५० वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. १९४९ मध्ये गुरुपोर्णिमेला श्रीधरस्वामी गडावर आले. श्रीधर स्वामींच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यांनी श्री. समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेची स्थापन १९५० साली केली. सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवून आणला. १९५३ मध्ये वरदपूर या पुण्यभूमीवर “श्रीधराश्रम” स्थापन केला. हे स्थान अगस्ती ऋषींची तपोभूमी होय. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थ भक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवूनन आणल्या.

ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून श्रीधर स्वामी समाधीस्त

श्रीधर स्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण १३ वर्षे एकांतवास केला होता. स्वामीजींनी प्रत्येक चातुर्मास एकांतपूर्ण अनुष्ठान करुन गुरूकृपेचा स्वानंद अनुभवला व जीवनातील अखेरची दहा वर्षे वरदपूर आश्रमातच एकांतातच व्यतीत केली. अशा या श्रीधरस्वामींनी १९६७ साली पुन्हा एकांत साधना सुरू केली. चैत्र वद्य द्वितीयेला १९ एप्रिल १९७३ रोजी सकाळी ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून श्रीधर स्वामी समाधीस्त झाले.

॥ नमो भगवते श्रीधराय ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

 

Web Title : श्रीधर स्वामी: परंपरा के समर्थक, समर्थ-शंकराचार्य के दर्शन, स्मरण दिवस

Web Summary : समर्थ रामदास स्वामी की परंपरा के शिष्य श्रीधर स्वामी ने सनातन धर्म के प्रसार के लिए जीवन समर्पित किया। उन्हें समर्थ रामदास और शंकराचार्य के दर्शन हुए, आश्रम स्थापित किए और दार्शनिक रचनाएँ लिखीं। 19 अप्रैल, 1973 को उनका निधन हो गया, जो आध्यात्मिक मार्गदर्शन और सेवा की विरासत छोड़ गए।

Web Title : Shridhar Swami: Proponent of Tradition, Vision of Samarth-Shankaracharya, Remembrance Day

Web Summary : Shridhar Swami, a disciple in Samarth Ramdas Swami's lineage, dedicated his life to spreading Sanatan Dharma. He received visions from Samarth Ramdas and Shankaracharya, established ashrams, and authored philosophical works. He passed away on April 19, 1973, leaving behind a legacy of spiritual guidance and service.