गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:29 IST2025-12-03T18:23:26+5:302025-12-03T18:29:10+5:30
Shreedhar Swami Jayanti 2025: दत्त जयंतीच्या दिवशी श्रीधर स्वामींची जयंती असते. जाणून घ्या...

गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
Shreedhar Swami Jayanti 2025: समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली । जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली । जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा । मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।। समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधर स्वामी महाराज. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती या दिवशी श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म झाला. या निमित्ताने समर्थ रामदास स्वामी संप्रदायात विशेष करून श्रीधर स्वामी यांची जयंती साजरी केली जाते. या शिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींनी दर्शन दिलेल्या, गुरुनिष्ठेचा परमादर्श असलेल्या श्रीधर स्वामी यांच्या दिव्य चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया...
७ डिसेंबर १९०८ रोजी दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी लाड-चिंचोळी येथे स्वामीजींचा जन्म झाला. मुलाचे नांव श्रीधर असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच श्रीधर स्वामींना कथा कीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कीर्तन श्रवण व व्यायाम अशा गोष्टींमध्ये श्रीधर स्वामींना रुची होती. वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी त्यांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांची श्रीरामावर श्रद्धा बसली होती. लौकिक दृष्टीने शालेय विद्याभ्यासाबरोबर वैदिक धर्मकर्माचाही अभ्यास ते करीत असत.
देशासाठी, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करण्याचे बीज खोलवर रुजले
हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पुणे विद्यार्थीगृहात ते विद्यार्थी व शिक्षकात अतिशय प्रिय होते. देशासाठी, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करण्याचे बीज याच काळात त्यांच्या मनात खोलवर रूजले गेले. भारतीय आर्य संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे यावर त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदासांचे चरित्र वाचून त्यांनी केलेल्या तपासारखे तप आपणही करावे असे त्यांना वाटू लागले. सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी जीवन समर्पित करावयाचे असे त्यांनी ठरविले होते. श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले.
दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थ रामदास स्वामींचे दर्शन
सन १९२७ च्या नवरात्रात दसरा दिवशी सीमोल्लंघन करून ते तपासाठी पुणे सोडून सज्जनगडावर पोहोचले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचे व श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून राहू लागले. जप, तप, सेवा, अभ्यास, दासबोध वाचन, करूणाष्टके पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ असे. १९३० च्या दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थांचे दर्शन झाले. श्रीधरांना या काळातच विदेह अवस्था प्राप्त झाली. श्री समर्थांच्या आज्ञेने गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून, जंगलातून गोकर्ण-महाबळेश्वरला गेले.
३२ वर्षे सतत धर्मप्रचाराचे कार्य
शिवानंद योगी व स्वामींची भेट झाली. अतूट नाते निर्माण झाले. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तप, साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. त्यांना ब्रह्मासनावर बसविले. तेथे रिद्धिसिद्धी योगिनी, शक्तिदेवता प्रकट झाल्या व सांगितले की, आपल्या धर्मकार्यासाठी आमचे आशिर्वाद व सहाय्य राहील. सन १९३५ चे सुमारास ते पुन्हा गडावर आले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले. स्वामीजींनी संन्यास धारण केल्यानंतर एकंदर ३२ वर्षे सतत धर्मप्रचाराचे कार्य केले.
सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा विकास
सन १९४१ मध्ये शिवानंदस्वामींनी देह ठेवल्यावर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी पाहिली. मठाचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. नंतर गडावर आले व पुढे महाराष्ट्रात भ्रमण करून पुन्हा सन १९४२ साली ते शिगेहळ्ळीला परत आले. त्या आश्रमात त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. आता श्रीधरबुवा हे ‘श्रीधरस्वामी’ म्हणून प्रसिद्धीस पावले. श्रीधर स्वामींच्या प्रतिभासंपन्नतेने ते अनेकांचे श्रद्धास्थान बनले. समर्थांनी प्रत्यक्ष दर्शनात श्रीधर स्वामींना “भगवान” म्हणून संबोधिले होते, असे म्हटले जाते. १९४७ पर्यंत कर्नाटकातील संचारानंतर उत्तर भारतात बहुतेक सर्व श्रद्धेय तीर्थक्षेत्रांना भेटी देत पारायणे, यज्ञयागादि कर्मे केली. समर्थांची ३५० वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. लोकांच्या अडीअडचणी उपासनामार्गाने सोडविण्यासाठी मार्गदर्शन करू लागले. १९४९ मध्ये गुरुपोर्णिमेला श्रीधरस्वामी गडावर आले. श्रीधर स्वामींच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यांनी श्री. समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेची स्थापन १९५० साली केली. सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवून आणला.
प्रत्येक कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद
१९५३ मध्ये वरदपूर या पुण्यभूमीवर “श्रीधराश्रम” स्थापन केला. हे स्थान अगस्ती ऋषींची तपोभूमी होय. श्री समर्थ सेवामंडळाच्या प्रत्येक कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद असे. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थ भक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवूनन आणल्या. इतके असूनही श्रीधर स्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण १३ वर्षे एकांतवास केला होता. स्वामीजींनी प्रत्येक चातुर्मास एकांतपूर्ण अनुष्ठान करुन गुरूकृपेचा स्वानंद अनुभवला व जीवनातील अखेरची दहा वर्षे वरदपूर आश्रमातच एकांतातच व्यतीत केली. अशा या श्रीधरस्वामींनी १९६७ साली पुन्हा एकांत साधना सुरू केली. चैत्र वद्य द्वितीयेला १९ एप्रिल १९७३ रोजी सकाळी ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून श्रीधर स्वामी समाधीस्त झाले.