Shravan Vrat 2022: शीतला देवीला आवडतात थंड आणि शिळे पदार्थ, तिचा उत्सव ४ ऑगस्ट रोजी शीतला सप्तमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:37 IST2022-08-03T12:36:06+5:302022-08-03T12:37:25+5:30
Sheetala Saptami Vrat 2022: गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत, त्याची तयारी आदल्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट रोजीच करा!

Shravan Vrat 2022: शीतला देवीला आवडतात थंड आणि शिळे पदार्थ, तिचा उत्सव ४ ऑगस्ट रोजी शीतला सप्तमी!
शीतला सप्तमी व्रत हे एक काम्यव्रत असून ते स्त्रियांनी करावे अशी प्रथा आहे. भारतात विविध भागात वेगवेगळ्या वेळी हे व्रत केले जाते. उत्तरेकडे हे आषाढ कृष्ण सप्तमीला तर इतर काही ठिकाणी श्रावण कृष्ण सप्तमीला केले जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात श्रावण शुक्ल सप्तमीला हे व्रत करतात. ४ ऑगस्ट रोजी हे व्रत करायचे असल्याने त्यादिवशीची पूर्वतयारी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्टला करता येईल.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध या ग्रंथात या व्रताची सविस्तर माहिती दिली आहे. या दिवशी शीतलादेवीची घरी किंवा देवळात जाऊन यथासांग पूजा करावी. तसेच आठ वर्षांहून लहान वयाच्या सात मुलींना जेवू घालावे. असे विधी असलेले एक व्रत शीतला व्रत म्हणूनही ओळखले जाते.
प्रामुख्याने शीतला देवीला थंड अन्न आवडते म्हणून आदल्या दिवशी सर्व स्वयंपाक करून त्याचा या सप्तमीच्या दिवशी नैवेद्य दाखवतात. या सप्तमीला पूर्ण दिवसात ताजा गरम स्वयंपाक केला जात नाही. या व्रताची एक कथा आहे -
हस्तिनापुराच्या इंद्रद्युम्न नामक राजाला महाधर्म नावाचा मुलगा आणि गुणोत्तमा नावाची मुलगी होती. यथाकाळ या मुलीचा विवाह झाला. विवाहानंतर सासरी जाताना वाटेत तिचा पती रथातून अदृश्य झाला. या अचानक ओढवलेल्या आपत्तीने नववधू गुणोत्तमा शोक करू लागली. पण नंतर धीर करून तिने मोठ्यांच्या सांगण्यावरून शीतलादेवीची सर्व शीतलोपचाराने मनोभावे पूजा केली. देवीच्या कृपेने गुणोत्तमेचा पती तिला परत मिळाला. पुढे दोघांनी सुखाचा संसार केला.
गृहिणींना एक दिवस स्वयंपाक करण्याच्या कष्टापासून मुक्ती देणारे हे व्रत जरूर करावे. त्यामुळे सर्वांनाच गरम अन्नाची किंमत कळू शकेल. मात्र येथे शिळे अन्न याचा अर्थ नासलेले, खराब होऊ लागलेले अन्न नव्हे, तर दुसऱ्या दिवशीही ज्या अन्नाच्या चवीत, रंगात वा सुगंधात फरक पडणार नाही. जसे की वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुऱ्या, दशम्या, सुक्या भाज्या, सुक्या चटण्या असे जिन्नस करणे अपेक्षित आहे. आता फ्रिजमुळे अन्न खराब होण्याचे भय राहिले नाही. दहीवडे, बुंदीरायते, विविध फळांची शिकरण असे खऱ्या अर्थाने शीतल पदार्थही या दिवसाच्या निमित्ताने केले, तर सर्वांनाच हे व्रत तनामनाला खऱ्या अर्थाने शीतलदायक वाटेल.