Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:53 IST2025-07-24T15:49:49+5:302025-07-24T15:53:56+5:30
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी ज्योतिषी सोळा सोमवारचे व्रत करा असे सुचवतात, तुम्हालाही ते करायचे असेल तर जाणून घ्या व्रतविधी!

Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
येत्या २५ जुलैपासून श्रावण(Shravan 2025) सुरू होत आहे आणि यंदा चार श्रावणी सोमवार(Shravan Somvar 2025) मिळणार आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सोळा सोमवार व्रताचे महत्त्व!
सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यापैकी कुणीही ते करू शकतात. हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात.
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
सोळा सोमवार पूजा विधी व नैवेद्य
या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात. मग अळणी पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा रोटल्याचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात. एका भागाचा नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे.
सतराव्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणाराने तिथे महापूजा करायची असते. त्यामद्ये सुवर्णचंपक, बेल, कमळ, बकुळ आणि पन्नग ही फुले आवश्यक असतात. यासाठी जो प्रसाद करावयाचा असतो त्यात पाच शेर कणीक, सव्वाशेर तूप आणि सव्वाशेर गूळ यांचे रोट करून ते गोवऱ्यांवर भाजतात. त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात. एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग आप्तेष्टांना भोजनप्रसंगी वाटतात, या वेळी सोळा ब्राह्मण मेहुणांनाही भोजन प्रसादास बोलवायचे असते. इष्टकामनापूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते.
सोळा सोमवार व्रताची कथा
विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते. तेथे एक शिवालय होते. बागबगीचा, तळे असा त्याचा सुंदर आसमंत होता. एकदा शिव पार्वती तेथून जात असतात त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व तेथे ते द्यूत खेळले. तयातील `पण' कुणी जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला. तेथे असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्याचा निर्णय देण्यास सांगितले. त्याने शिवाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शाप दिला. त्यामुळे तो रोगी झाला.
पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. देवलाने ते केले. त्यामुळे तो रोगमुक्त झाला.नंतर शिव पार्वती परत तेथे एकदा आले. देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने त्याला काय उपचार केला, असे विचारले तेव्हा त्याने केलेल्या सोळा सोमवार व्रताची हकीगत तिला सांगितली.
पुढे एकदा पार्वतीवर रागावून तिचा मुलगा षडानन निघून गेला. खूप शोध केला तरी तो सापडेना. तेव्हा पार्वतीने सोळा सोमवारचे व्रत केले. षडानन तिला येऊन भेटला. सोळा सोमवार व्रताच्या अशा आणखीन काही कथा आहेत.
असे हे व्रत रोगातून, पापातून मुक्ती देणारे आहे, तसेच अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ती होण्यासाठीदेखील हे व्रत करतात. तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला लागा...
गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य