Shravan Somvar 2024: यंदा श्रावणी सोमवार किती? कधी कोणती शिवामूठ वाहायची आणि त्याचे महत्त्व काय? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:07 IST2024-08-03T13:07:19+5:302024-08-03T13:07:50+5:30
Shravan Somvar 2024: ५ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार येत आहे, तेव्हापासून सुरू झालेला श्रावण मास आणि श्रावणी सोमवारचे व्रत याबद्दल जाणून घेऊ.

Shravan Somvar 2024: यंदा श्रावणी सोमवार किती? कधी कोणती शिवामूठ वाहायची आणि त्याचे महत्त्व काय? वाचा!
यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरु होत असून २ सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहे. या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिला आपण शिवामूठ असे म्हणतो. ती कधी, कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पु्हा पार्वतीमातेचे पतीराज. शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी `गौरीहार' पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची (Shivamuth 2024) कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल, असे मत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर मांडतात.
पूर्वी स्त्रियाां घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे. अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत. आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो.
आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे. त्यामुळे त्याच्या संसाराला दत होई. देण्याचा आनंद काय असतो, हे अशा व्रतामधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही, तर वाढ होते, मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न! ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणींना समाधान, तर मूठ मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून ताम्हनात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे.
अशी जुन्या-नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेपः सुखिन: सन्तु अर्थात सगळ्यांचे सुख, हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे. तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा.
यंदाच्या श्रावणी सोमवारी (Shravan Somwar 2024) वाहायची शिवामूठ :
५ ऑगस्ट : तांदूळ
१२ ऑगस्ट : तीळ
१९ ऑगस्ट : मूग
२६ ऑगस्ट : जव
२ सप्टेंबर : सातू