Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:31 IST2025-08-07T15:31:02+5:302025-08-07T15:31:52+5:30

Shravan Purnima 2025: 'वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा' असे म्हणत समुद्रात स्वत:ला झोकून देणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमेला रामाची पूजा करतात, का ते जाणून घ्या.

Shravan Purnima 2025: Why do Kolibandhavs worship Lord Rama on Shravan Purnima? Know the reason! | Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!

Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!

यंदा ८ ऑगस्ट रोजी म्हणजे नारळी पौर्णिमा(Narali Purnima 2025) तथा श्रावण पौर्णिमा(Shravan Purnima 2025) आहे. त्यादिवशी समस्त कोळीबांधव सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात आणि पावसामुळे स्थगित झालेला मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरू करतात. लाटांवर स्वार होत ते रामाला साद घालतात, `वल्हव रे नाखवा होऽऽ वल्हव रे रामाऽऽ'

तुम्ही म्हणाल, हे तर लतादीदींनी गायलेले सुप्रसिद्ध गीत आहे. त्याचा आणि रामायणाचा काय संबंध? कोळीबांधव नाव वल्हवत रामा होऽऽऽ म्हणत जी साद घालतात किंवा बंगालमध्ये `ओ माजी रेऽऽऽ' म्हणतात, ती रामायणातल्या रामाला असते का? हे सगळे काही आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला रामायणात डोकवावे लागेल. 

Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

राजा दशरथाला अर्थात आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी रामचंद्र, सीता माई आणि लक्ष्मण सर्व संग परित्याग करून वल्कले नेसून दंडकारण्यात जायला निघाले. सुमंतांनी त्या तिघांना गंगाघाटापर्यंत आणून सोडले. तिथून पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता. परंतु वाटेत विस्तीर्ण गंगा नदी होती. तिचे विशाल पात्र पार करून जायचे, तर नावेची गरज लागणार होती. त्यावेळेस समस्त नावाडी रामसेवेसाठी उपस्थित होते. परंतु रामप्रभुंना कोणाकडूनही सेवा घ्यायची नव्हती. मात्र सूर्यास्त होण्याआधी गंगेचे पात्र ओलांडून पलीकडे जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नावेची सेवा घ्यावी लागली.

त्यावेळेस नावाड्यांचा प्रमुख गुहक नावाडी रामसेवेसाठी पुढे आला आणि त्याने रामचरणांची पाद्यपूजा करून त्यांना आपल्या नावेत घेतले. नाव वल्हवत दुसऱ्या तीरापर्यंत आणली. परंतु राम उतरायला तयार होईना. फुकट सेवा घ्यायची नाही, असे ठरवले असतानाही सेवा घेतली होती, पण मोबदला काय द्यायचा ही विवंचना रामप्रभूंना त्रस्त करत होती. त्यावेळेस सीतामार्इंनी रामरायाला आपल्या साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत खुणेनेच विचारले, `ही अंगठी दिली तर चालेल का?'

Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

आपल्यावर आलेला मानहानीचा प्रसंग आपल्या पत्नीने न बोलता सोडवला हे पाहून रामप्रभूंना तिचे कौतुक वाटले. त्यांनी ती मुद्रिका अर्थात अंगठी गुहक नावड्याला देऊ केली, तेव्हा गुहक नावाडी म्हणाला, 

'रामप्रभू, तुम्ही आम्ही एकाच बिरादरीचे! मी गंगेचा नावाडी, तुम्ही भवसागर पार करून नेणारे नावाडी. एकाच व्यवसायातल्या दोन व्यावसायिकांनी परस्परांशी व्यवहार करायचा नसतो. हे नितीला धरून नाही!' हे गुहक नावड्याचे बोलणे नसून हा भक्त भगवंतामधला संवाद होता. लक्ष्मण आणि सीतामाई आश्चर्याने पाहत होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र गुहकाला म्हणतात, `अंगठी देऊ नको म्हणतोस, मग मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ तरी कसा?'

त्यावेळेस गुहक नावड्याने सांगितले, 'प्रभू रामा, तुझी नौका मी एका तीरावरून दुसऱ्या तीराला लावली, तशी आम्हा कोळीबांधवांची जीवननौका तू पैरतीराला लाव! आम्ही समुद्रात स्वत:ला झोकून देतो. ते तुझ्या भरवशावरच. आमच्या प्राणांच्या रक्षणाची ग्वाही दे!'

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!

हे ऐकल्यावर रामचंद्रांनी तथास्तु म्हणत गुहकाला आश्वस्त केले आणि केवळ गुहकाचाच नाही, तर समस्त कोळीबांधवांचा रामरायाने उद्धार केला....
म्हणून आजही समुद्रात नाव वल्हवताना कोळीबांधव रामाचा गजर करत स्वत:ला झोकून देतात....वल्हव रे नाखवा होऽऽऽ वल्हव रे रामाऽऽऽ!

Web Title: Shravan Purnima 2025: Why do Kolibandhavs worship Lord Rama on Shravan Purnima? Know the reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.