श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 02:21 PM2023-08-19T14:21:45+5:302023-08-19T14:23:00+5:30

Shravan Durva Ganpati Vrat 2023: श्रावणात करावयाचे पुण्य फलदायी दूर्वागणपती व्रत आणि अमृतासमान दुर्वांचे महत्त्व जाणून घ्या...

shravan maas 2023 know all about shravan durva ganpati vrat puja vidhi vrat katha and significance of durva in marathi | श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा

श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा

googlenewsNext

Shravan Durva Ganpati Vrat 2023: निज श्रावण मास सुरू झाला आहे. रविवार, २० ऑगस्ट रोजी श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. चातुर्मासातील श्रावण हा व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला महिना. श्रावणातील प्रत्येक सणाचे महत्त्व अनन्य साधारण असून, निसर्गाशी असलेली सांगड विशेष आहे. श्रावणातील व्रते आणि आचरणाच्या परंपरांना खास अर्थ आहे. तो लक्षात घेऊन व्रताचरण केल्यास व्रते साजरे करण्याचा परमानंद प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जाते. श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दुर्वा गणपतीचे व्रत, व्रताचरणाची योग्य पद्धत, पूजाविधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घेऊया... (Shravan Durva Ganpati Vrat)

श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. श्रावणातील विनायक चतुर्थीला दूर्वागणपती व्रत केले जाते. दूर्वागणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते. हे व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते. या व्रताच्या उद्यापनाच्यावेळी पिठाचे तुपात तळलेले अठरा मोदक लागतात. या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक गणपतीसमोर ठेवावेत; उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यावेत. उरलेले सहा मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दूर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले आहे. (Shravan Durva Ganpati Vrat Puja Vidhi)

दूर्वागणपती व्रताचरण आणि पूजाविधी

व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. लाल वस्त्र वाहून षोडशोपचारांनी पूजा करावी. त्यावेळी गणेशचतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री, फुले असल्यास उत्तम. मात्र आघाडा, शमी या पत्री आवर्जून अर्पण कराव्यात. धूप-दीप-नैवेद्या दाखवून आरती करावी. आरतीनंतर ‘गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन । व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ।। ‘ अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये दूर्वांना विशेष महत्त्व आहे. म्हणून इतर पत्रींप्रमाणेच दूर्वाही अर्पण कराव्या. एरवी गणपतीची नावे घेत सहा दूर्वा वाहाव्या. मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास एकवीस दूर्वा वाहाव्या. व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्तीदेखील चालू शकेल. श्रावणात दूर्वा भरपूर उगवतात. तसेच इतर सर्व पत्री, फुले सहज मिळू शकतात. व्रत फारसे अवघड नाही. (Shravan Durva Ganpati Vrat Importnace) 

गणपती बाप्पाला दूर्वा अत्यंत प्रिय

गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Significance Of Durva In Ganpati Puja)

अमृतासमान दुर्वा

दुर्वा औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता, अनंता, गौरी, महौषधि, शतपर्वा, भार्गवी या नावांनी ओळखले जाते. असे म्हणतात की, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला, तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली, त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले, त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली. म्हणजेच, ही वनस्पती अमृतासमान आहे. (Shravan Durva Ganpati Vrat Katha)

दूर्वागणपती व्रतकथा

पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला. बाप्पानी राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले. परंतु, त्या विषारी राक्षकाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ गाठी खाण्यासाठी दिल्या. तसेच २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. 

दुर्वांचे त्रिदल महत्त्वाचे

गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पाने ठेवतो, तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच, बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो. हार उपलब्ध नसेल, तर २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते. तीदेखील उपलब्ध नसेल, तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते. दुर्वा अर्पण करताना अनन्यभावे हात जोडून मंत्र म्हणावा, ‘श्री गणेशाय नम:, दुर्वाकुरान् समर्पयामि!’ अशाप्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले, तर बाप्पाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. 

 

Web Title: shravan maas 2023 know all about shravan durva ganpati vrat puja vidhi vrat katha and significance of durva in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.