व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:36 IST2025-07-15T12:33:06+5:302025-07-15T12:36:50+5:30
Shravan Maas 2025 Start Date: श्रावणात असणाऱ्या व्रतांना, सणांना वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे. जाणून घ्या...

व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
Shravan Maas 2025: श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांतील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावास्येला महिना होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये आषाढ अमावास्येनंतर श्रावण मासाची सुरुवात होईल.
महाराष्ट्रात यंदा शुक्रवार, २५ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत असून, शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत श्रावण महिना असेल. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार, पालन यांची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते, असे मानले जाते. त्यामुळे या काळात महादेवांची उपासना, नामस्मरण करण्यावर भर दिला जातो, असे म्हटले जाते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो.
श्रावणात व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल
श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. पृथ्वीने नवीन गालीचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावण. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती. आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते.
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास
- श्रावणी सोमवार: श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदा, २८ जुलै २०२५ रोजी पहिला श्रावणी सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५ रोजी दुसरा श्रावणी सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ तिसरा श्रावणी सोमवार आणि १८ ऑगस्ट २०२५ चौथा श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे.
- श्रावणी मंगळवार: श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते. अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री जागरण केले जाते. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. तसेच सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
- श्रावणी बुधवार: श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. हे व्रत सात वर्षे केले जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते.
- श्रावणी शुक्रवार/जिवतीची पूजा: श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीत या लहान मुलांचे रक्षण करणारी, त्यांना उदंड आयुष्य चिंतणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतेही आहेत. जीवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत. संतती रक्षणार्थ मानली जाते.
- श्रावणी शनिवार/अश्वस्थ-मारुती, नृसिंह पूजन: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढून त्याचे पूजन केले जाते.
- श्रावणी रविवार/आदित्य राणूबाई व्रत: श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल.
- यंदा श्रावण महिन्यात २८ जुलै रोजी विनायक चतुर्थी, २९ जुलै रोजी नागपंचमी, ५ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकदशी, ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, १२ ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी, १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाळा, दहिहंडी, १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे.