Shravan 2025: श्रावणात गजानन विजय पारायण कसे करावे? तीन की सात दिवसात? वाचा सविस्तर माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:51 IST2025-07-30T17:51:00+5:302025-07-30T17:51:48+5:30
Shravan 2025: श्रावणात अनेक उपासनांपैकी एक उपासना म्हणजे पोथी किंवा ग्रंथांचे पारायण, मात्र प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून ते कसे कारावे याबाबत मार्गदर्शन!

Shravan 2025: श्रावणात गजानन विजय पारायण कसे करावे? तीन की सात दिवसात? वाचा सविस्तर माहिती!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
माझ्या मैत्रीणीने काल मला महाराजांच्या पोथीचे पारायण कसे करावे? असा प्रश्न विचारला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न. खरे सांगायचे तर अध्यात्म हा आपल्यातील आणि महाराजांच्या मधील सेतू आहे. आपल्या गुरूंवर असलेले प्रेम, भक्ती श्रद्धा ह्याचे प्रतिक म्हणजे आपण करत असलेली सेवा. ही सेवा करण्याची अनेक माध्यमे आहेत जसे नामस्मरण, प्रदक्षिणा, प्रत्यक्ष गुरूस्थळी जसे अक्कलकोट, शिर्डी इथे जाऊन घेतलेले दर्शन, भंडारा, पोथीवाचन. ह्या माध्यमातून आपण त्यांचे नित्य स्मरण करत असतो आणि त्यांच्या समीप जात असतो.
अध्यात्म ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ जो मला अभिप्रेत आहे तो “महाराजांच्या सोबत २४ तास प्रत्येक क्षणी जगणे.'' आपल्या दिनक्रमात आचार विचारात तेच सदैव असावेत हीच भक्ती आहे. वेगळे काहीच करायची गरज उरत नाही, तरीही आपण काहीतरी करत राहतो, ज्यामुळे आपल्याला जगण्याचे बळ मिळते, कठीण प्रसंगात ते उपयोगी पडते. गजानन महाराज पोथीचे पारायण हेही त्यापैकीच एक!
श्री गजानन विजय हा पवित्र ग्रंथ कसा वाचवा? त्यात २१ अध्याय आहेत. मग रोज ९ अध्याय वाचून ३ दिवसाचे पारायण करावे किंवा रोज ३ अध्याय वाचून साप्ताह करावा. रोज एक अध्याय वाचून २१ दिवसाचे पारायण करावे की एकाच दिवसात पूर्ण पोथी वाचावी? दासगणू महाराजांनी २१ व्या अध्यायात ह्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की गुरुपुष्य योगावर ह्याचे पारायण करावे किंवा दशमी एकादशी द्वादशीला ह्याचे पारायण करावे. हे मार्गदर्शन जरी असले तरी इतरही वेळा आपण पारायण करतो त्यावेळी ते करताना आपल्या नित्य दिनक्रमाप्रमाणे करावे असे माझे मत आहे. एकच वेळ हवी का? बसायला पाट हवा की लोकरी आसन? आधी जप करावा का? पोथीची पूजा करावी का? किती अध्याय वाचावे? पूर्ण झाले की मेहूण बोलवावे का? उपवास करावा का? नेवेद्य काय करावा? रोज अमुकच अध्याय वाचावेत का? चाफाच वाहवा का? ह्या सर्वाची उत्तरे तुमचे मन तुम्हाला देईल. ह्या पलीकडे कधी जाणार आपले विचार? मी कसे वाचले त्यापेक्षा, किती तळमळीने वाचले ते महत्वाचे आहे!
महाराजांचे बारीक लक्ष असते आपल्या भक्तांकडे! कोण कुठल्या भावनेतून पारायण करत आहे, हे त्यांना माहित असते. अहो बाप आहे तो आपला! त्याला आपल्या अभिवृत्ती माहित आहेत. कुणी दाखवण्यासाठी बडेजाव करण्यासाठी करत आहे, की कुणी महाराजांच्या प्रेमापोटी एक सेवा म्हणून करत आहे, ह्याचा सगळा हिशोब त्यांच्याकडे असतो. म्हणूनच अत्यंत श्रद्धेने पारायण करावे, त्यावेळी दुसरा कुठलाही विचार मनाला स्पर्शून गेला नाही पाहिजे. एकरूप होऊन वाचावे आणि त्यांचे स्मरण करावे.
ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे पारायण करावे. पण आपण सर्व प्रापंचिक माणसे आहोत. नोकरी करणारे आहोत, घरात आज पाणी नाही आले, कुणी आजारी आहे, मुलांच्या परीक्षा आहेत, ह्या सर्व एक ना दोन अनेक गोष्टी सांभाळून आपण त्यांचे स्मरण करत आहोत, ही गोष्ट महाराजांना माहित नाही का? प्रपंच करून परमार्थ करावा तोच फळतो. एखादा गरीब माणूस असेल, त्याने मोदक, झुणका भाकर नैवेद्याला केली नाही, किंबहुना ती त्याला करणे शक्य नसेल, तर महाराज त्याला प्रसन्न होणार नाहीत की काय? मनोभावे नमस्कार केला तरी महाराज प्रसन्न होतील. त्यांना प्रसन्न करण्याचा अट्टाहास कशाला? त्यासाठी आपण आपल्या श्रीमंतीचे अवडंबर माजवणे अयोग्य होईल.
पारायण काय, कुठलीही अन्य सेवा केली तर त्याचा उल्लेख वाच्यता सुद्धा करू नये, नाहीतर गेले सर्व गंगेला! त्याने आपला अहं मात्र फुलतो आणि महाराज दूर जातात . मी हे केले ते केले हे नको कारण, त्यांनी ते करून घेतले आहे हा भाव मनी असावा.
तर सांगायचे तात्पर्य असे. पारायण आपल्या वेळेप्रमाणे करावे, पण त्याचा खेळ खंडोबा नको. जे काही ठरवाल ते पूर्णत्वाला न्यावे इतकेच! अध्याय कसे वाचावे हेही आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे ठरवावे. कुणाला काहीही विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा आणि वाचन सुरु करा. महाराज तुमच्याकडून बरोबर पारायण करून घेतील. त्यांना हवा तो नेवेद्य सुद्धा करून घेतील आणि भरपूर आशीर्वाद सुद्धा देतील.
ह्या सर्वापलीकडे जाऊन मला जे वाटते ते असे, पारायण करताना शेगाव डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. पातुरकरांचा वाडा, दामोदर पितांबर, पत्रावळीवर जेवणारे आपले महाराज सर्व काही जसेच्या तसे अनुभवता आले पाहिजे. प्रत्येक अध्याय वाचनाने जिवंत करता आला पाहिजे इतक्या तळमळीने, श्रद्धेने त्याचे वाचन झाले पाहिजे. अधून मधून चाफ्याचा सुगंध आजूबाजूला दरवळला पाहिजे आणि महाराजांचे पोथीतील अस्तित्व जाणवले पाहिजे. जानकीराम सोनाराने विस्तव दिला नाही म्हणून बंकटलालाने नुसती काडी धरली आणि चिलीम पेटली त्याचा धूर डोळ्यात गेला पाहिजे! जानराव देशमुख, टाकळीकरांचा शांत झालेला घोडा, महाराजांना प्रदक्षिणा घालणारी गाय, विहिरीत जीव मुठीत धरून बसलेला गणू , पाटील मंडळीना उसाचा रस काढून दिला तोही हाताने उसाची मोळी पिळून, श्रीधरने चार वाजता आणलेला नेवेद्य इथपासून ते महाराजांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या टाळूवर ठेवलेले लोणी सर्व काही डोळ्यासमोर तसेच्या तसे अनुभवता आले पाहिजे. पोथी कुठेही वाचा, आपले तनमनधन सर्व काही शेगावात पाहिजे त्यांच्या चरणाशी. समोर सर्व २१ अध्यायातील प्रसंग जणू घडत आहेत हा प्रत्यक्ष अनुभव घेणे म्हणजेच “श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण “ असे मला वाटते.
आज शेगावला रोज अनेक भाषांतून लाखो पोथ्या भक्त आत्यंतिक प्रेमाने घेत आहेत. पोथी आणली पण वाचली का? कशी वाचली? सोवळे सर्व केले, अनेक नेवेद्य काही विचारू नका, पण आमची कामे होत नाहीत! ह्याचे कारण त्यात आपला जीव ओतायचा राहून गेला! बरे त्यांनी प्रचीती कधी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त निव्वळ प्रचीतीसाठी पारायण नको, त्यांच्यावरील प्रेमापोटी पारायण करावे. पारायण करण्याची संधी त्यांनी दिली म्हणून त्यांचे ऋणी असावे. पारायण करतानासुद्धा शेजारी महाराज बसले आहेत हा भाव ठेवावा म्हणजे त्यात अधिक एकरूपता येईल. मी तर महाराजांना सांगते मध्ये कुणी आले घराची बेल वाजली तर मी उठणार बरे का महाराज, पण तुम्ही कुठेही जाऊ नका!
मनाची शुद्धता आणि अंतकरणातील भाव इतके सोळा आणे खरा हवा की महाराजांनी समाधी घेतली, तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या पाहिजेत, तर ते वाचन त्यांच्या हृदयापर्यंत गेले असे समजायला हरकत नाही. जितक्या वेळा पारायण तितकी बसल्या जागी शेगाव ची यात्रा. इतका भाव असेल तर का नाही पूर्ण करणार महाराज आपल्या इच्छा? तिळमात्र सुद्धा शंका नाही मला त्यात. प्रचीतीविना भक्ती नाही त्यामुळे ती त्यांना द्यावीच लागेल आणि ते दिल्याशिवाय राहतही नाहीत. पारायण त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही, ह्याची पोचपावती देईल ते तुमचे स्वतःचे मन आणि अंतरात्मा! बस सुज्ञास सांगणे न लगे...
पण भाव इतका खोल, उदात्त हवा, की निखळ श्रद्धा आणि प्रेमाने आपण त्यांचे मन जिंकू शकतो. महाराज आपल्या भावाचे प्रेमाचे भक्तीचे भुकेले आहेत. नाहीतर लक्ष्मण घुड्या सारखे होईल. आहे हे सर्व त्यांचेच आहे आणि त्यांच्याच राज्यात आपण आनंदात आहोत हा भाव असला पाहिजे. भौतिक सुखांच्याही पलीकडे जाऊन सुखाची न्यारी चव चाखायला मिळते ते “अध्यात्म'' साधक कधीही भौतिक सुखांची लालसा करणार नाही. एखादी म्हातारी आजीबाई त्यांना नमस्कार करून जेव्हा नातसून पाहायला मिळूदे'' असे म्हणते तेव्हा महाराजांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असेल. आपण साधी सामान्य माणसे आहोत तेव्हा कितीही नाही म्हटले तरी काहीतरी मागणारच हे त्यानाही माहित आहे फक्त भाव हवा.
महाबळेश्वर, मसुरी, दार्जीलिंग, काश्मीर, दुबई, अमेरिका झाले की वेळ मिळाला तर शेगाव, असे मात्र करू नये. इतर सर्व ठिकाणी जा पण त्यांना भेटायला जायची तळमळ तितकीच असली पाहिजे, त्यांची भेट ही पर्याय नसून प्रायोरिटीअसली पाहिजे. सहमत?
श्री गजानन विजय पारायण आपल्या वास्तूत झालेच पाहिजे तेही अगणित वेळा. आपल्या भावजया, नणंदा, मैत्रिणी, नात्यातील ओळखीच्या सर्व स्त्रियांनी, पुरुषांनी मिळून चक्री पारायण करावे. श्रावणातील अनेक उपासनांच्या पैकी एक उपासना आहे. भिशी करतो त्याही पेक्षा ओसंडून वाहणारा उत्साह हवा अर्थात तो अपोआप येतो. महाराज घरी येणार ही काय खायची गोष्ट नाही. प्रचंड सकारात्मक भावनिक अध्यात्मिक वातावरण अनुभवणे म्हणजे पारायण. आपल्या सर्वाना ह्या श्रावणातील आपण करत असलेल्या अनेकविध उपासना आनंद, आत्यंतिक समाधान आणि जगण्याचे बळ मिळूदे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .
संपर्क : 8104639230