Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 07:00 IST2023-08-16T07:00:00+5:302023-08-16T07:00:02+5:30
Shravan 2023: यंदा अधिक श्रावण मास आल्याने श्रावण मास लांबला, पण १७ ऑगस्टपासून निज श्रावण सुरू होत आहे, त्यासाठी रोज करावी अशी ही उपासना!

Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा!
१७ ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे. हा महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण या काळात भगवान महाविष्णू विश्रांती घेत असताना जगाचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शंकर यांच्यावर असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या महिन्यात शिवपुजेला प्राधान्य दिले जाते. हा महिना भगवान शंकराचा आवडता महिना आहे. कारण तो व्रत वैकल्यांनी सजलेला आहे. अशा या प्रसन्न काळात शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसले तरी आपल्याला त्याचे नित्य स्मरण करून पावन होता येईल. त्यासाठी पुढे दिलेला श्लोक रोज सकाळ संध्याकाळ म्हणावा.
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
सोरटी सोमनाथ, श्रीशैल, महाकालेश्वर, ओंकारमांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औढ्या नागनाथ, काशी विश्वनाथ, त्रंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळ येथील पशुपतीनाथ हेही यातील आहे. परंतु हिमालयातील केदार आणि नेपाळ येथील पशुपतीनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग धरले जाते.
ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज, ज्योती म्हणजे ज्ञान, ज्योती म्हणजे प्रेरणा आणि ज्योती म्हणजे चेतना. ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशात लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आमची संस्कृती एक आहे अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ही ज्योतिर्लिंगे. एकराष्ट्रीयत्वाची ही एक खूण आहे. मानवाला प्रकाश, चेतना, तेज, ज्ञान, प्रेरणा देणारी ही ज्योतिर्लिंगे आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन पहावीत. तूर्तास श्रावण मासानिमित्त त्याचे स्मरण करून पावन व्हावे!