शिवप्रताप दिन: मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवप्रताप दिन का म्हणतात ते माहितीये? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:05 IST2025-11-27T07:00:01+5:302025-11-27T07:05:01+5:30

शिवप्रताप दिन : मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झालेला इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक, वाचा तो रोमांचक प्रसंग!

Shiv Pratap Din: Do you know why Margashirsha Shuddha Saptami is called Shiv Pratap Din? Read! | शिवप्रताप दिन: मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवप्रताप दिन का म्हणतात ते माहितीये? वाचा!

शिवप्रताप दिन: मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवप्रताप दिन का म्हणतात ते माहितीये? वाचा!

>> राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश्वर उपासनी 

अफझलखानाचा वध झाला तो मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला. आजच्या दिवसाला आपण  " शिवप्रतापदिन "  म्हणतो.  आजच्या दिवसाचा प्रत्येक हिंदुनेच नाही तर प्रत्येक राष्ट्राभिमानी भारतीयाने सार्थ अभिमान बाळगावा असा अलौकिक, असंभवनीय व अकल्पनीय पराक्रम छत्रपती शिवरायांनी व त्यांच्या मूठभर निष्ठावान मावळ्यांनी करून दाखविल्याची ऐतिहासिक नोंद आपणास बघावयास मिळते.

धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या निमित्ताने संपूर्ण मराठी मनाला नव्हे हिंदू जनमानसाला राष्ट्रगुरु समर्थ रामदास यांनी केलेला उपदेश आजही संपूर्णतया सर्वार्थाने प्रासंगिक आहे, असे आपल्या लक्षात येईल. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रगुरु समर्थ रामदास म्हणतात.......

शिवरायाचे आठवावे रूप । 
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायाचा आठवावा साक्षेप । 
भूमंडळी ।। 
शिवरायांचे कैसे चालणे । 
शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांचे सलगी देणे । 
कैसे कैसे।।

प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियांनी निदान आज तरी हे पत्र शांत चित्ताने पूर्णांशाने वाचून हा उपदेश केवळ छत्रपती संभाजी राजांना नसून तो आपल्यासाठी सुद्धा आहे याची जाणिव करुन घेणे गरजेचे आहे.
 
दिनांक १० नोव्हेंबर १६५९ / मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी

आजच्याच दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी दुपारी साधारणतः दोन वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवरायांनी, विजापूर दरबारातुन शिवरायांना नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलून आलेल्या पाषवी ताकतीचा क्रूरकर्मा, प्रचंड सैन्यबळ असलेल्या आणि पराकोटीचा हिंदुद्वेष रोमारोमात भरलेल्या अफजलखानाला एकांगी गाठून आपल्या प्राणावर उदार होउन त्याचा कोथळा बाहेर काढला. हा इतिहास आपण विसरता कामा नये. 

आज संपूर्ण जगाला त्राहिमाम् करणाऱ्या कट्टर इस्लामिक आतंक वादावरील संजीवन मात्रा कशी असावी ? किंवा अतिशय मार्मिक व शत्रु पक्षाचा पूर्ण नि:पात करणारा सर्जिकल स्ट्राइक कसा असावा ? याचे हे इतिहासातील अतिशय सुंदर व आदर्श उदाहरण आहे.

जो समाज इतिहासातून काही शिकत नाही तो समाज इतिहासजमा होतो, शिल्लक राहत नाही, नामशेष होतो हा इतिहास आहे. म्हणून शिवप्रभूंच्या संपूर्ण चरित्राकडे पुन्हा एकदा नव्या डोळस अभ्यासाच्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. 

शिवरायांचे व्यवस्थापन, त्यांचा पराक्रम, त्यांचे संघटन कौशल्य, त्यांची माणूस ओळखण्याची क्षमता, त्यांची शास्त्रशुद्धता,त्यांची शस्त्र सिध्दता, शत्रूच्या प्रत्येक बारीक हालचालीचा त्यांनी केलेला अभ्यास, देवदुर्लभ कार्यकर्त्यांचे त्यांनी उभारलेले संघटन, या सर्वांच्या जोडीला ईश्‍वरी अधिष्ठान,  व पराकोटीच्या लोककल्याणाची तळमळ हे शिवप्रभूंच्या चरित्रातिल गुण आज केवळ राज्यकर्त्यांनीच अंगी बांणले पाहिजे असे नाही तर हा सामान्य राष्ट्रप्रिय नागरिकांचा सर्वंकष स्वभाव व्हावा, अशी आजची गरज आहे. आजच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिवरायांच्या या सर्व गुणांचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे.

अफजल खान व छत्रपती शिवराय यांची भेट संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ही इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. त्या काळातील सर्व राजकीय सत्ता शिवरायांच्या विरोधात होत्या व या संघर्षात शिवरायांचा संपूर्ण नि:पात होईल याच भ्रमात नव्हे स्वप्नात होत्या. अफजलखानाचा सर्वार्थाने अभ्यास करुन शिवबांनी आपल्या मर्यादित सैन्य बळाचे अतिशय काटेकोर, सुयोग्य, वक्तशीर, मर्मघाती व जिवावर उदार होऊन लढण्याच्या क्षमतेचा वापर करत, केलेले नियोजन हे जगातील युद्धशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी आजही आव्हानाचा / अभ्यासाचा विषय आहे. 

अफजलखानाचा सारख्या प्रचंड शारीरिक बल असलेल्या शत्रूशी स्वतः एकांगी भेट घेणे हा खरं म्हणजे एक प्रकारचा आत्मघातच ठरला असता. पण पराकोटीच्या संकटामध्ये राष्ट्रनायक, अग्रेसर,  लोकनेता कसा असावा याचे हे इतिहासातील असामान्य, जितेजागते, लोक विलक्षण उदाहरणच नाही का? संकट समयी संकटाला मी प्रत्यक्ष सामोरा जाईन व माझ्या सामान्य रयतेची काळजी करेन हा कृतीशील संदेश यातून शिवरायांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला.

अफझलखानाच्या वधानंतर स्वराज्याच्या राजकिय कक्षाच केवळ रुंदावल्या नाही, तर मराठ्यांच्या मनगटाच्या पराक्रमाची जाणीव संपूर्ण जगाला झाली. इथून पुढे शिवरायांनी अखंड यत्न करून पराक्रमाचे, हिंदू स्वाभिमानाचे आणि स्वराज्य स्थापनेचे जे कैलास शिखर गाठले त्याला इतिहासात तोड नाही. म्हणून आज शिवबांच्या या पराक्रमाचा प्रकर्षाने अभ्यास करण्याची गरज आहे. 

राष्ट्रगुरु समर्थ रामदास, शिवाजी राजांच्या पराक्रमाच्या संदर्भात बोलताना म्हणतात......

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हां कारणे ।।

शिवाजी राजांकडून तत्कालिन विचारवंतांची, समाज धुरीणांची,संतांची ,सामान्यजनांची असलेली अपेक्षाच समर्थांनी या शब्दात व्यक्त केलेली आहे. शिवरायांच्या या कल्पनातीत पार्थ पराक्रमाचे वर्णन करताना शाहीर म्हणतात........

वाघनखी चे शस्त्र अनोखे हाती बांधुनी ।
जावळिच्या रानात साधली शिकार शिवबांनी ।। 
किर्र रान माजले भयंकर जावळीचे खोरे ।
तसे माजले स्वजन घातकी चंद्रराव मोरे ।    
आदिलशाहीच्या दरबारी चा पहिला मानकरी ।
झंझावाता सम आला हा अफझुल्ला समरी ।
'विजापूराचा वाघ' म्हणवितो कपटाने चाले ।
या कपटाला निपटायाला राजे अवतरले ।
सावध सैनिक, सावध सारे, सावध हाकारे ।
त्या वाघाला घेरून धरती जाती सामोरे । 
घनघोर गर्जना करुनी। हर महादेव बोलोनी।
जय शिवबा । जय माय भवानी।
गनिमा वरती  स्वधर्म रक्षक जाती चालोनी ।
जावळिच्या रानात साधली शिकार शिवबानी ।।

अशा या विचक्षण, पराक्रमी, संपन्न चरित्र, दिव्य दृष्टी असलेल्या सर्वंकष विजयाचे निष्कलंक धनी असलेल्या , हिंदू जनसामान्यांमध्ये चेतनेचे एक नवे विजयपर्व, निर्माण करणाऱ्या या  पण्यश्लोक,उदार,युगंधर, धीरगंभीर, शुर क्रीयेसी तत्पर अशा युगपुरुषास मानाचा मुजरा.......!
शतशः कृतज्ञ प्रणाम.......!  

राष्ट्रीय कीर्तनकार व शिवकथाकार ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज,
अमळनेर जि. जळगाव.
९४२२२८४६६६ / ७९७२००२८७०

Web Title : शिव प्रताप दिन: शिवाजी महाराज की अफजल खान पर विजय की याद।

Web Summary : शिव प्रताप दिन शिवाजी महाराज की अफजल खान पर साहसी जीत की याद दिलाता है। यह दिन प्रत्येक भारतीय को शिवाजी की वीरता, रणनीतिक प्रतिभा और स्वराज के प्रति प्रतिबद्धता की याद दिलाता है। उनके गुण सभी नागरिकों को प्रेरित करने चाहिए।

Web Title : Shiv Pratap Din: Remembering Shivaji Maharaj's victory over Afzal Khan.

Web Summary : Shiv Pratap Din commemorates Shivaji Maharaj's courageous victory over Afzal Khan. This day reminds every Indian of Shivaji's bravery, strategic brilliance, and commitment to Swarajya. His qualities should inspire all citizens.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.