Shattila Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: २०२५ची दुसरी एकादशी पौष महिन्याच्या वद्य पक्षातील षट्तिला एकादशी शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी आहे. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूंचे पूजन आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते. अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात. प्रत्येक एकादशीचे नाव आणि त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे. पौष वद्य षट्तिला एकादशीचे महत्त्व, मान्यता, महात्म्य आणि व्रत पूजा विधी कसा करावा, याबाबत जाणून घेऊया...
पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, याबाबत सांगितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट्तिला एकादशी. निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत लाभदायक ठरते, असे म्हटले जाते.
पौष वद्य षट्तिला एकादशी: शनिवार, २५ जानेवारी २०२५
पौष वद्य षट्तिला एकादशी प्रारंभ: शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०७ वाजून २४ मिनिटे.
पौष वद्य षट्तिला एकादशी सांगता: शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे पौष वद्य षट्तिला एकादशीचे व्रत शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी करावे, असे म्हटले जात आहे. तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षट्तिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते.
षट्तिला एकादशी व्रतपूजा विधी
सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
षट्तिला एकादशी व्रताची सांगता
षट्तिला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
षट्तिला एकादशीची व्रतकथा
पद्म पुराणात षट्तिला एकादशीची व्रत कथा आढळते. त्यानुसार एक महिला विष्णूभक्त होती. तिने विष्णूंची उपासना केली. भक्ती केली. तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली. तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचे कारण विचारले, तेव्हा विष्णू तिला म्हणाले की, गत जन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी कोणाला दान धर्म केला नाहीस. एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विन्मुख पाठवले. तुझ्या पदरी दान धर्माचा पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचे दान कर. अन्न दान श्रेष्ठ दान आहे. त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तुला वैकुंठ प्राप्ती होईल. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. म्हणून केवळ स्वतः साठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा, यथाशक्ती दानधर्म करा. जेणेकरून विष्णूकृपेचा लाभ प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.