Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:57 IST2024-08-30T13:56:57+5:302024-08-30T13:57:57+5:30
Shani Pradosh 2024: श्रावण शनिवारी अश्वत्थ पूजन केले जाते, त्यात शनि प्रदोषही आल्याने दिलेले उपाय शनि दोष निवरणासाठी नक्कीच उपयोगी पडतील.

Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन!
शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो. त्यातही तो श्रावणातला शेवटचा शनिवार (Shravan Shanivar 2024). या दिवशी अश्वत्थ पूजन (Ashvath Pujan 2024) केले जाते. अश्वत्थ अर्थात पिंपळ! या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. शनिवारी जप, तप, ध्यान, दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते. जाणून घेऊया कोणते उपाय करावेत ते!
ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. ग्रहस्थिती सुधारते. आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या, त्यामुळे मीठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात. ते पुढील प्रमाणे-
>> शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही, तर केवळ चमचा भर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता.
>> शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसभरापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
शनिवारी करावेत असे उपाय
>> शनिवारी दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. यामुळे सुख समृद्धी मिळेल.
>> शनिवारी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही.
>> शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पाणी घालावे आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते. कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे.
>> शनिवारी एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी. शनी देवांचा आशीर्वाद लाभेल.
>> शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो.
अर्थात यापैकी जे उपाय सहज शक्य असतील ते अवश्य करावे आणि वास्तुदोष दूर करावेत.