भविष्य पाहता येत नसूनही चिमणीचे भाकीत कसे खरे ठरले पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 14:35 IST2021-06-17T14:35:30+5:302021-06-17T14:35:47+5:30
जो स्वावलंबी असतो, तोच ठरवलेली गोष्ट पूर्ण करू शकतो. परावलंबी नाही!

भविष्य पाहता येत नसूनही चिमणीचे भाकीत कसे खरे ठरले पाहा!
चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का?
पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आलेला, तो सांगत होता, उद्या त्याची मुलं येऊन झाडाची कापणी करणार आहेत. मग आपण बेघर होऊ, याच विचाराने आम्ही उदार आहोत!'
चिमणी म्हणाली, 'काळजी करू नका पिलांनो, उद्या कोणी येणार नाही. तुम्ही निश्चिन्त राहा.'
दुसऱ्या दिवशी खरोखरच कोणीच आले नाही.
काही दिवसांनी पुन्हा पिलांनी आईकडे काळजी व्यक्त केली, 'आई आई, आज शेतकरी आला होता. तो उद्या त्याचे कामगार पाठवून शेतात छाटणी करणार आहे. आपण बेघर झालो तर?'
चिमणीने पुन्हा तीच भविष्यवाणी केली आणि तेव्हाही ती खरी ठरली.
आणखी काही दिवसांनी पिल्लं गयावया करू लागली. 'आई आज शेतकरी आला होता. तो सांगत होता की उद्या तोच येऊन पिकांची आणि झाडाची कापणी करणार आहे.
त्यादिवशी मात्र चिमणी म्हणाली, 'आता आपण मुक्काम हलवायला हवा' असे म्हणत रातोरात त्यांनी जागा बदलली आणि दुसऱ्या झाडावर घरटे बांधले. दुसऱ्या दिवशी खरोखरच शेतकरी आला आणि त्याने ठरवल्याप्रमाणे झाडांची आणि पिकाची कापणी केली.
त्या दिवशी संध्याकाळी पिल्लं आईला म्हणाली, 'आई याआधी आम्ही तक्रार करून सुद्धा तू दुर्लक्ष केलं आणि कोणी येणार नाही सांगून वेळ मारून नेलीस. पण यंदा मात्र त्वरित स्थलांतरित होण्याचा निर्णय कसा घेतलास? तुला भविष्य पाहता येतं का?'
चिमणीने हसून पिलांना पंखाखाली घेत म्हटले, 'पिलांनो, इतके दिवस शेतकरी दुसऱ्यांवर अवलंबून होता. त्यामुळे त्याचे काम रखडले होते. पण आज तो स्वतः येणार होता, म्हणजे तो स्वतंत्र झाला होता. जो स्वावलंबी असतो, तोच ठरवलेली गोष्ट पूर्ण करू शकतो. परावलंबी नाही! म्हणून तुम्ही सुद्धा आता घरट्याबाहेर पडायला शिका आणि स्वावलंबी व्हा!'