फाल्गुन वद्य षष्ठी: संत एकनाथ महाराजांची समाधी, ४ गोष्टींची थोरवी सांगणारी तिथी; एक पर्वणीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 18:47 IST2026-03-08T18:45:50+5:302026-03-08T18:47:21+5:30
Sant Eknath Maharaj Shashti 2026: संत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निवडणे हा योगायोगाचा भाग नाही. तर विचारपूर्वक निवडलेला हा दिवस आहे, असे सांगितले जाते.

फाल्गुन वद्य षष्ठी: संत एकनाथ महाराजांची समाधी, ४ गोष्टींची थोरवी सांगणारी तिथी; एक पर्वणीच!
Sant Eknath Maharaj Shashti 2026: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, प्रत्येक संतांची शिकवण कालातीत असल्याचे पाहायला मिळते. इतकी वर्षे लोटूनही संतांनी समाजाला केलेला उपदेश आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतो, याची प्रचिती येते. मराठी वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन. याच फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली. त्यामुळे ही फाल्गुन वद्य षष्ठी तिथी एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. यंदा, सोमवार, ०९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन वद्य संत एकनाथ षष्ठी आहे.
पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो, असे सांगितले जाते. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधली, ज्ञानेश्वरीची प्रतही शुद्ध केली
महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी, नारदीय कीर्तनाचे समर्थक आणि प्रसारक संत एकनाथ महाराज. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. संत एकनाथ यांनी अनेक अभंग, काव्यरचना, भारूडे लिहिली. संत एकनाथ यांची ग्रंथसंपदा अगदी विपूल आहे. विस्मरणात गेलेली संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधण्याचे काम संत एकनाथांनी केले. शिवाय ज्ञानेश्वरीची प्रतही शुद्ध केली.
मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन
संत एकनाथ महाराजांची ग्रंथसंपदा अगदी अफाट आहे. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यवनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाजसंघटन केले. भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. संत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निवडणे हा योगायोगाचा किंवा अपघाताचा भाग नाही. तर विचारपूर्वक निवडलेला हा दिवस आहे, असे सांगितले जाते.
संत एकनाथ महाराजांची समाधी, ४ गोष्टींची थोरवी सांगणारी फाल्गुन वद्य षष्ठी
संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींना आत्मसाक्षात्कार फाल्गुन वद्य षष्ठीला झाला. जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांवर जो अनुग्रह केला, तो दिवसही फाल्गुन वद्य षष्ठीचा होता आणि जनार्दन स्वामी यांनी अवतार समाप्ती केली, ती फाल्गुन वद्य षष्ठीलाच केली. तोच दिवस संत एकनाथ महाराजांनी आपल्या समाधीसाठी निवडावा, हे लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे, असे सांगितले जाते. षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचे कीर्तन म्हणजे लोकांचे देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचे कीर्तनही रंगले. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश केला.