संकष्ट चतुर्थी २०२६: तुम्ही बाप्पाला २१ दुर्वा वाहता? मग त्या दुर्वा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवतात ते नक्की वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:40 IST2026-03-06T10:39:25+5:302026-03-06T10:40:33+5:30
Sankashti Chaturthi 2026 Importance Of Durva For Ganpati: बाप्पाला दुर्वा आवडतात हे आपण जाणतोच, पण त्याला २१ दुर्वांच का वाहायच्या, हा प्रश्न कधी पडला असेल तर जाणून घ्या हे समाधानकारक उत्तर.

संकष्ट चतुर्थी २०२६: तुम्ही बाप्पाला २१ दुर्वा वाहता? मग त्या दुर्वा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवतात ते नक्की वाचा!
Sankashti Chaturthi March 2026: गणपती बाप्पाची पूजा करताना आपण २१ दुर्वांच्या जोड्या आवर्जून अर्पण करतो. पण कधी विचार केला आहे का की, हे संख्याशास्त्र नक्की काय आहे? ही केवळ एक परंपरा आहे की त्यामागे काही सूक्ष्म विज्ञान दडलेले आहे? आज ६ मार्च २०२६ संकष्ट चतुर्थीच्या(Sankashti Chaturthi 2026) शुभ मुहूर्तावर, २१ दुर्वांच्या या आध्यात्मिक रहस्याचा उलगडा करून घेऊ.
श्रीगणेशाला २१ दुर्वा वाहणे ही एक अत्यंत प्रभावशाली उपासना मानली जाते. 'दुर्वा' या शब्दाचा उगमच मुळी “दु:खं व्रजति इति दुर्वा” असा आहे, ज्याचा अर्थ होतो— 'जी भक्ताची सर्व दुःखे दूर करते, ती दुर्वा'.
दुर्वा: अनंत चेतनेचे प्रतीक
दुर्वा हे एक साधे तृण असले तरी ते अजेयतेचे प्रतीक आहे. कितीही कापले तरी ते पुन्हा पुन्हा उगम पावते. हे आपल्या आत्म्याच्या अमरत्वाचे आणि पुनरुत्थानाचे दर्शन घडवते. गणपती हा पृथ्वी तत्त्वाचा आणि मूलाधार चक्राचा अधिपती आहे आणि दुर्वा या थेट पृथ्वी तत्त्वाशी जोडलेल्या असल्याने बाप्पाला त्या अत्यंत प्रिय आहेत.
२१ दुर्वा: २१ पायऱ्यांची अंतर्यात्रा
२१ दुर्वा अर्पण करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचे २१ स्तर ईश्वराच्या चरणी समर्पित करणे होय. २१ दुर्वा अर्पण करताना त्यातील प्रत्येक दुर्वा एका विशिष्ट आध्यात्मिक पायरीचे प्रतीक आहे. कशी ते पाहू.
१. एकाग्रता – मन एकवटण्याची सुरुवात.
२. द्वैत निवृत्ती – मी-तू, सुख-दुःख यापलीकडे जाणे.
३. त्रिगुण शमन – सत्त्व, रज, तम यांवर संयम मिळवणे.
४. चतुर्वेद पूजन – ज्ञानप्राप्तीची खरी दिशा सापडणे.
५. पंचतत्त्व साक्षात्कार – पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे संतुलन.
६. षड्चक्र जागृती – मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंत ऊर्जा प्रवाहाची निर्मिती करणे.
७. सप्तधातू शुद्धी – शरीरातील सात धातूंची निर्मळता साधणे.
८. अष्टदिशा रक्षण – संपूर्ण जीवनात रक्षणभाव निर्माण होणे.
९. नवग्रह शांतता – जीवनातील ग्रहदोष निवारण करणे.
१०. दशदिक्बंधन निर्मूलन – दहाही दिशांमधील नकारात्मक ऊर्जा शमवणे.
११. एकादश रुद्र तत्त्व प्रबोधन – स्वतःमधील रुद्रतेज जागृत करणे.
१२. द्वादश आदित्य तेज जागरण – सूर्याप्रमाणे तेजस्वी विचारांचे जागरण होणे.
१३. त्रयोदशी – मृत्युतत्त्वावर विजय मिळवणे.
१४. चतुर्दशी – मनातील सर्व प्रकारच्या भयावर मात करणे.
१५. पौर्णिमा – आयुष्यात समृद्धी आणि शांतीची प्राप्ती होणे.
१६. सोडस संस्कार जागृती – जीवनातील महत्त्वाचे १६ संस्कार जागृत करणे.
१७. सप्तर्षि स्मरण – ऋषीमुनींनी दाखवलेल्या ज्ञानमार्गाची स्मृती ठेवणे.
१८. अष्टसिद्धींची प्राप्ती – कर्मातून सिद्धी मिळवण्याचे बळ प्राप्त होणे.
१९. नवविधा भक्तीचा अभ्यास – भक्तीच्या नऊ प्रकारांतून ईश्वराशी जोडले जाणे.
२०. विश्वरूप दर्शनाची पात्रता – चराचरातील ईश्वरी रूप पाहण्याची दृष्टी मिळवणे.
२१. पूर्ण आत्मसमर्पण – ‘त्वमेव सर्वं’ या भावाने स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करणे.
संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी!
२१ दुर्वांच्या अर्पणाचा आध्यात्मिक प्रभाव
जेव्हा आपण “ॐ गं गणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि” हा मंत्र म्हणत एक-एक दुर्वा अर्पण करतो, तेव्हा आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रांवर (Chakras) सकारात्मक परिणाम होतो.
चित्त शुद्धी: दुर्वांच्या थंड प्रकृतीमुळे साधकाचे डोकं शांत राहते आणि विचारांची चंचलता कमी होते.
आरोग्य लाभ: शास्त्रानुसार, जो गणेशाला नियमित दुर्वा अर्पण करतो, त्याला दीर्घायुष्य लाभते.
नकारात्मकता निवारण: २१ दुर्वांच्या माध्यमातून आपण आपल्या १० दिशांमधील नकारात्मक ऊर्जा शमवून 'दशदिक्बंधन' करतो.
सांगता आणि समर्पण
२१ दुर्वा म्हणजे प्रत्यक्षात “ईश्वराला अर्पण केलेल्या २१ मौन प्रार्थना” आहेत. जेव्हा श्रद्धा आणि ध्यान यांची जोड या विधीला मिळते, तेव्हा श्रीगणेश 'सिद्धिदाता' रूपात प्रकट होऊन भक्ताला आशिर्वाद देतो— "विघ्न नाही, विजयी हो!"