पावसाळ्यात पाऊस गायब? वरुणराजाला आवाहन करण्यासाठी म्हणा ऋग्वेदातील 'हे' प्रभावी स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:12 IST2025-08-12T11:12:02+5:302025-08-12T11:12:33+5:30

वेद मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे, संस्कृतातच नाही तर मराठीतही भाषांतरीत आहे; सुट्टीवर गेलेल्या पावसाला आवाहन करण्यासाठी हे स्तोत्र कामी येईल!

Rain disappears during monsoon? To appeal to Varuna, recite this effective hymn from the Rig Veda! | पावसाळ्यात पाऊस गायब? वरुणराजाला आवाहन करण्यासाठी म्हणा ऋग्वेदातील 'हे' प्रभावी स्तोत्र!

पावसाळ्यात पाऊस गायब? वरुणराजाला आवाहन करण्यासाठी म्हणा ऋग्वेदातील 'हे' प्रभावी स्तोत्र!

यंदा पावसाने ऐन मे महिन्यात हजेरी लावली. उन्हाची काहिली दूर झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. मात्र ऋतूचक्रात बिघाड झाल्यामुळे आषाढात श्रावण सरी बरसून गेल्या आणि आता श्रावणात अनेक ठिकाणी पाऊस रजेवर गेला आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबर हिट तीही ऑगस्ट मध्ये सुरु झाल्याने सणासुदीचा उत्साह कमी होत आहे. अशा वेळी निसर्गाला आवाहन करण्यासाठी आपल्या ऋषी मुनींनी वेदांमध्ये वेगवेगळी स्तोत्र लिहिली आहेत. ज्यांच्या मंत्रोच्चाराने परिस्तिथी बदलण्यास मदत होते. असेच एक स्तोत्र ऋग्वेदात दिले आहे, ज्याचे नाव आहे पर्जन्य सूक्त! हे स्तोत्र स्पष्ट उच्चारात आणि सामूहिक पठण केल्यास पर्जन्य वृष्टी होते असा पूर्वजांचा अनुभव आहे. सामूहिकपणे शक्य नसेल तर हे स्तोत्र आपण आपल्या दैनंदिन उपासनेतही म्हणू शकतो. सामूहिकरित्या म्हटल्याने त्याचा अधिक लाभ होतो. 

पर्जन्य सूक्ताचे महत्त्व : 

पर्जन्य सूक्त हे वेदांमधील एक महत्त्वपूर्ण स्तोत्र आहे. ऋग्वेदातील हे सूक्त पर्जन्य देवतेची स्तुती करते. पर्जन्य देवता ही पर्जन्य म्हणजेच पावसाचे देवता आहे. हे स्तोत्र पावसाच्या महत्त्वाचे वर्णन करते आणि त्याच्या अनंत शक्तीचे वर्णन करते. पर्जन्य सूक्ताच्या प्रत्येक श्लोकामध्ये विशिष्ट अर्थ आणि गहन तत्त्वज्ञान आहे. या श्लोकांमध्ये पर्जन्य देवतेची महती आणि त्याच्या कृपेने होणारे आशीर्वाद वर्णिलेले आहेत. पर्जन्य देवतेच्या कृपेमुळे जमिनीवर उगवणारे अन्नधान्य, वनस्पती आणि जीवसृष्टी यांचे वर्णन केलेले आहे.

पर्जन्यसूक्ताचे आधुनिक काळातील महत्त्व : 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील वेदिक तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी झालेले नाही. पर्जन्य सूक्ताच्या माध्यमातून आपण जलसंवर्धन आणि पर्यावरणीय जागरूकता वाढवू शकतो. आधुनिक जीवनात वेदिक तत्त्वज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. पर्जन्य सूक्ताच्या मंत्रांमध्ये अद्भुत आध्यात्मिक शक्ती आहे. वृष्टि आणि कृषी क्षेत्रात या मंत्रांचा उपयोग करून पाऊस पाडण्यासाठी आणि चांगली पिके येण्यासाठी प्रार्थना केली जाते. मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हे मंत्र प्रभावी ठरतात. ज्यांना संस्कृत सूक्त म्हणता येणार नाही, त्यांच्यासाठी मराठीत भाषांतरित केलेले स्तोत्र पुढीलप्रमाणे

श्री गणेशाय नमः ।  

गंगा गोदावरी माता । वृद्ध माता जगाची जी । वंदिली पूजिली माता।आशीर्वाद मिळावया॥1॥

पर्जन्य वृष्टी जगासाठी। व्हावया सुखकारक। जशी पूर्वीस्तुती केली। ऐलुष कवषादिकी॥2॥

तीच स्तुती मराठीत। केली माते तुझ्या कृपे। यश दे, बुद्धी दे माते। स्तवितो मी परोपरी॥3॥

स्तुतीसाठी भावभक्ति। तुझ्यापाशी मागितली। जणु स्तुती तुझी तुच । करविलीनिमित्त मी॥4॥

स्तुति तुझी भाव माझे। तोकडे बोल बोबडे। गोड करी तसे तेही। आशिर्वचन देऊनी॥5॥

आधार ऋचा ज्यामूळ। संक्षिप्त भाव हे जरी। घेऊनी आवश्यचि जे। कैसे संक्षिप्त सूक्त हें॥6॥

भावपूर्ती मानूनी घे । संक्षीप्त भाव ही जरी । न्यून ते पूर्ण मानोनि। क्षमा करी क्षमा करी॥7॥

क्षमा करी कृपाकरी। पूर्तता ही मानोनिया। पुन्हा पुन्हा प्रार्थितो मी। फलश्रुती तशीच दे॥8॥

यश गावे पर्जन्याचे। पर्जन्य वृष्टी व्हावया। पूर्वी स्तुती केली ज्यांनी। त्या परीच आतां करु॥9॥

पर्जन्याची प्रशंसा नी । स्तुती करुं अशा परी। प्रणतीपूर्वक अशी। मनोभावे सेवा करु॥10॥

वीर पुंगव तो करी। गडगडाट वृष्टी ही। वर्षाव करी तात्काळ सुखवी जनमानस॥11॥

वृष्टीरुपे वीर्यबीज ।औषधीत तसेच ते। प्रविष्ट करीतो बीज । वनस्पतीत ही तसें॥12॥

अमृतमय वृष्टीने । आरोग्य पूर्ण औषधी । तशाच ही वनस्पती। मानवासाठी जीवन॥13॥

प्रचंड वृक्ष पाडी तो। उलथवूनी टाकितो। सप्पा तसा उडवीतो। राक्षसांचा तसाच तो॥14॥

भयंकर शस्त्र त्याचे । पाहतां जग भीतसे। गाळण उडते त्यांची। गडगडाट ऐकुनी॥15॥

पर्जन्य गर्जना करीतो। नाद होतो भयंकर। पातक्यांना ठार करी। जलवर्षक वीर तो॥16॥

भयंकर नादाने त्या। पातकी भीतसे जसा। निरपराधी ही भीतो। वीराला जलवर्षक॥17॥

भितो नी पळतो दूर। निरपराधी ही तसा। अपराध्या ठार करी। वीर तो जलवर्षक॥18॥

मेघ जणू पर्जन्याचे । सारे सेवक शोभती। सेवकांना अशा सार्‍या। जमवितो एकत्र तो॥19॥

गगन सारे भरी तेंव्हा। जगास दिसती सेवक। पर्जन्य दाखवी जणू । आशादायक दृष्यचि॥20॥

आकाश भरतो सारे। मेघांनी ओतप्रोत ते। गगन मंडल सारे। मेघ रुपें आनंद चि॥21॥

तशा स्थितीत मेघांच्या। ऐकू येतात गर्जना। सिंह नाद जणू होतो। गगनी सारखाचि तो॥22॥

सिंहनाद मेघनाद। गर्जना श्रेष्ठ कोणती? कळोनी येईना हे की। दोन्हीही सम वाटती॥23॥

नभांत इतक्या दूर। होऊनी ऐकू येतसे। चित्त थरारक नाद। परी आनंद देतसे॥24॥

हर्षतो नाचतो जीव। अंतरी भीतसे जरी। होईल म्हणूनी वृष्टी। हर्ष नी मोद अंतरी॥25॥

वाहती वादळे वारे । वीजांचे उत्पात ही। फुटताती औषधींना। अंकुर ही नवे नवे ॥26॥

नभ भरते मेघांनी। जगा पोसावया जणू। भूवरी धान्य समृद्धि। आणि होतसे विपुल ती॥27॥

घडतो हा चमत्कार। पर्जन्य वर्षतो जधी। वीर्य – वृष्टी वृष्टीरुप। धरणीवर तो तधीं॥28॥

सिरसानम्र हो पृथ्वी। ज्याच्या आशे करोनिया। ज्याच्या केवळ ईच्छेने।बागडूं लागती पशू॥29॥

खुरे ज्यांना पशू सारे। फुरफुरती ते तसे। तशी सारी पशू सृष्टी। उल्हासते नी हर्षतेंं॥30॥

आज्ञेने ज्याच्या धरती। सर्व प्रकारची रुपे। वनस्पती सृष्टी ही सारी। तृप्त समृध्द होतसे॥31॥

असा हे पर्जन्या तूं जो। सुखांचे श्रेष्ठ स्थानचि। तसा हो सुखवी आम्हा। त्यासाठी प्रार्थितो तुला॥32॥

कृपाकरी आम्हांवरी। मरुत हो कृपा तुम्ही। द्युलोकांतून त्या मार्गे। पाण्याचे पूर वाहवा॥33॥

समोर गर्जना कर्त्या। पर्जन्या ये मेघांसह। करीत वृष्टी पाण्याची। ये विपुल जलांसह॥34॥

पिता तू परमेेशर। आमुचा अससी खरा। पर्जन्या हे सत्य सारे। आम्हावरी कृपा करी॥35॥

गडगडाट कर तूं। मोठ्याने गर्जना कर । उदकरुप तो गर्भ भूीत ठेव आपुला॥ 36॥

संचार कर सर्वत्र। जलमय रथातूनी। मेघरुप पालखीचे। मेघा तोंड खुले करी॥37॥

ओढी पालखी उलटी।खाली ओत उपडी। ज्यामुंळे खांचखळगे। जलमयचि होऊ दे॥38॥

पृथ्वीचे उंचवटे ही। ओतप्रोत सारे भरी। तुडुंब भरी हे सारे। सारे होतील सारखे॥39॥

जलमय होऊ दे सारी। धरा वसुंधरा ही ती। न्हाऊन निघू दे पृथ्वी। तरुण युवती परी॥40॥

आपुला जलाशय तो। विस्तृत उचली वर। नभांत नेई तू त्यास। तेथून कर सिंचन॥41॥

भूीवरी खाली करी। करी उदक सिंचन। आधीच मोकळे केले। कालवे दुथडी वाहूं दे॥42॥

दिव्य धृतें करी आर्द्र । आकाश आणि पृथ्वी। दिव्य जलचि घृत हे । दिव्य जलचि घृत हे ॥43॥

अवघ्या पवित्र धेनु। ज्यास धर्मही मानितो। तान्हेल्या अशा त्यांना। मनमुराद पाणी दे॥44॥

मानवी जीव नी पशू। सारेचि तृप्त होऊ दे। त्यासाठी भूीवर तू। संतत धार तू धरी॥45॥

तृप्त सारेचि होईतो। धरी संतत धार तू। प्रार्थितो हे तुला आम्ही। मेघा तू ऐक प्रार्थना ॥46॥

दुष्ट अवर्षण त्याचा। मेघा करीशी नाश तू । गर्जनेने निनादाने। जोराच्या जलवृष्टीने॥47॥

तेव्हा पृथ्वीवर जे जे। चल आणि अचल ही। नाचू लागे डुलू लागे। आनंदाने खरोखरी॥48॥

केलीस वृष्टी तू मेघा। धनत्तर खरोखरी। तृप्त केली धरा सारी। जलवृष्टी करोनिया॥49॥

वालुकामय निर्जल। प्रदेश जलपूर्ण ते। करुनी तृप्त केलेत। नंदवनचि जणू॥50॥

उपजिविका जीवांची। योग्य व्हावी म्हणोनिया। धान्य निर्मिले त्यासाठी। तशा उत्कृष्ट औषधी ॥51॥

घेतलेस धन्यवाद। मनःपूर्वक यामुळे। लोकांकडून तू मेघा। पर्जन्य वृष्टीच्या मुळें ॥52॥

जीवन म्हणती पाण्या। खरोखरीच जीवन। मानवी जीवनामृत।जीवनसार्थ नाम हे ॥53॥

मेघापासूनी निर्माण। होतेविपूल पाणी जे। उप्तन्न कर्ते जे मेघा। त्या मेघांची स्तुति करुं ॥54॥

त्रिप्रकार ॐ काराची। स्तुति तीन प्रकारची। गाताचि होतसे वृष्टी। आवश्य चि भूीवरी ॥55॥

जलवृष्टी वाढवीते।अन्न पाणीही देतसे। भूवरी अमृतवृष्टी। जलधारा रुपांत ही ॥56॥

उत्कर्ष जल यज्ञानें। देवांचा मानवासह। दोघांचा होतसे याने। या यज्ञाहुतीमुळे ॥57॥

सारे जगचि ज्यावरी। राहते अवलंबून। ज्यामुळे तीनही लोक। चालती हे जलामुळे ॥58॥

मेघ सिंचन करिती। विपुल पर्जन्य वृष्टि ती। तिन्ही लोकां जीवन दे। पर्जन्य उपकारक ॥59॥

पर्जन्य वृष्टि साठीच। केलेले स्तोत्र हे असे। मन:पुर्वक पठणाने । वृष्टी विपुल होतसे ॥60॥

फळे फुलें औषधीही। धन, धान्य समृद्धिही। स्तुतीमुळे मिळो आम्हां। भावनाही धरी मनी ॥61॥

त्रिजग कर्ता पर्जन्य। माझे संरक्षण करो। आयुष्य शतवर्षांचे। उदकाने मिळो मज ॥62॥

स्थावर जंगमा मूळ। पर्जन्यचि खरोखरी। सुजलां सुफलां करी। जगत्रय मोदे भरी ॥63॥

संरक्षावे सर्वांगाते। कल्याणही करोनिया। सदोदित क्षे व्हावे। ही पर्जन्यास प्रार्थना ॥64॥

औषधीसह ते अन्न। प्राप्त हो पर्जन्यामुळे। ही स्तुति त्याच हेतुनें। अन्नौषधी मिळावया ॥65॥

विपुल मिळतां सारे। सहज समृद्धि मिळे। समृद्धि नी अभिवृद्धि। असा उत्कर्ष होवूं दे॥66॥

सहासष्ट अशा ओव्या। अनुवादात घेतल्या। छंदात अनुष्टुभी ज्या। गुंफल्या चरणी वाहिल्या ॥67॥

श्री स्वामी समर्थांची। पूजा बांधली वाङमयी। गोड करी स्वामी राया। प्रार्थना ही तुम्हाप्रती ॥68॥

Web Title: Rain disappears during monsoon? To appeal to Varuna, recite this effective hymn from the Rig Veda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.