Pitru Paksha 2023: दुपारच्या वेळेत का करतात श्राद्ध तर्पण विधी? योग्य दिशा कोणती असावी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:50 IST2023-09-29T13:46:39+5:302023-09-29T13:50:34+5:30
Pitru Paksha 2023: पितृपक्षातील अनेकविध विधी दुपारच्या प्रहरात केले जातात. पुराण, शास्त्रात याबाबत काय सांगते? जाणून घ्या...

Pitru Paksha 2023: दुपारच्या वेळेत का करतात श्राद्ध तर्पण विधी? योग्य दिशा कोणती असावी?
Pitru Paksha 2023: यंदाच्या वर्षी २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पितृ पंधरवडा आहे. प्रतिपदा ते अमावास्या या काळात पितृपक्षाचे श्राद्ध विधी केले जातात. संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सण-उत्सवांपेक्षा पितृपक्षाचा कालावधी सर्वाधिक असल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते, असे म्हटले जाते. पितृपक्षात घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे, असे सांगितले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी केले जातात. मात्र, श्राद्ध विधी दुपारच्या प्रहरात का केले जातात? पिंडदान आणि तर्पण करण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घेऊया...
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. श्रद्धापूर्वक हे विधी करताना, प्रयत्नपूर्वक कार्य करण्याची एक समन्वयी भूमिका आपल्या धर्मशास्त्राने घालून दिली आहे. श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे. दुपारच्या प्रहरात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी, पिंडदान केले जाते. ब्राह्म मुहूर्तापासून ते सकाळची वेळ ही देवतांची मानली गेली आहे. तशी तिन्ही सांजेची वेळही देवतांच्या पूजनाची मानली गेली आहे. मात्र, दुपारचे प्रहर हे पूर्वजांचे स्मरण, पूजन आणि श्राद्ध विधींसाठी असतात, असे शास्त्र सांगते. म्हणूनच या कालावधीत देवतांचे पूजन वर्ज्य मानण्यात आले आहे.
देवलोक आणि मृत्यूलोक यांमधील पोकळीत पितृलोक
एका मान्यतेनुसार, देवलोक आणि मृत्यूलोक यांमधील पोकळीत पितृलोक असतो. सूर्योदय पूर्वेकडून होतो आणि पूर्व दिशा देवतांची मानली गेली आहे. दुपारच्या प्रहरी सूर्य मध्यावर असतो. सूर्याच्या माध्यमातून पूर्वजांना अंश प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. आणखी एका मान्यतेनुसार, दुपारनंतर सूर्य पश्चिमेकडे अस्ताला जातो. सूर्य किरणे निस्तेज होऊ लागतात. या कालावधीत पूर्वज पिंडदान, तर्पण आणि अर्पण केलेल्या वस्तू ग्रहण करू शकतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
श्राद्धविधी करतानाची योग्य दिशा कोणती असावी?
एका मान्यतेनुसार, पूर्वजांचा आगमन हे दक्षिण दिशेकडून होते. शास्त्रांतील माहितीनुसार, दक्षिण दिशेला चंद्राच्या वरील बाजूस पितृलोक स्थित आहे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. यासाठी पूर्वजांचे अनुष्ठान हे दक्षिणेला केले जाते. राजा दशरथ अनंतात विलीन झाले, तेव्हा श्रीरामांना स्वप्नात राजा दशरथ दक्षिण दिशेला जाताना दिसले. तसेच रावणाच्या मृत्यूपूर्वी त्रिजटाला स्वप्नात रावण गाढवावर बसून, दक्षिण दिशेला जाताना दिसला, असे काही उल्लेख रामायणात आढळून येतात, असे सांगितले जाते.
पिंड तांदळाच्या पिठाचे का केले जाते?
भाताचे पिंडदान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. पिंड गोलाकार असण्यामागेही काही कारणे सांगितली जातात. शरीरालाही पिंड मानले गेले आहे. आपली पृथ्वीही गोल आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही निर्गुण, निराकार रुपाचे पूजन अत्यंत कमी जणांना शक्य होते. पूजन, नामस्मरण, आराधना, उपासनेसाठी काही ना काही प्रतीक लागते. त्यामुळे पूर्वजांचे स्मरण, पूजन करण्यासाठी गोलाकार पिंड तयार केले जातात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तांदळाच्या पिंडाला पायस अन्न मानले आहे. तांदूळ नसल्यास जवाच्या पिठाचे पिंड बनवू शकतात. तांदळाला अक्षत मानले जाते. तांदळात असलेले गुणधर्म संपत नाही. तांदूळ हे थंड प्रकृतीचे असतात. आपल्या पितरांना शांती मिळावी आणि दीर्घकाळापर्यंत त्यांना या पिंडांपासून समाधान मिळावे, म्हणून पिंड तांदळाच्या पिठाचे केले जाते.
पांढऱ्या फुलांचा वापर प्रामुख्याने केला जातो
पितृपक्षातील श्राद्ध तर्पण विधी करताना पांढऱ्या रंगांच्या फुलांना अधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. पांढरा रंग सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. आत्म्याचा कोणताही रंग नसतो. रुप नसते. पितृलोकातील जग हे रंगहीन, पारदर्शी असल्याचे सांगितले जाते. पूर्वजांचे स्मरण, पूजन करताना सात्विकतेचा भाव मनात असावा, यासाठी पांढऱ्या फुलांचा वापर प्रामुख्याने केला जातो. आणखी एका मान्यतेनुसार, पांढरा रंग हा चंद्राशी संबंधित मानला गेला आहे.