हिंदू पंचांगातील शेवटचा आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला 'फाल्गुन' महिना १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी ओळख असलेल्या या महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडून दाखवणारा हा विशेष लेख.
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षचक्राचा 'फाल्गुन' हा १२ वा म्हणजेच शेवटचा महिना. शिशिर ऋतूचा हा दुसरा महिना असून या काळात निसर्ग जुनी पाने गाळून नव्या पालवीसाठी सज्ज होत असतो. १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या महिन्याबद्दलची ही रंजक आणि शास्त्रीय माहिती.
'फाल्गुन' नाव कसे पडले?
या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा त्या आसपास 'पूर्वा फाल्गुनी' हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. प्राचीन काळी या महिन्याचे नाव 'तपस्य' असे होते. कालांतराने नक्षत्रांच्या नावावरून महिन्यांची ओळख निश्चित झाली.
'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात?
फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने आणि यात होळी-धुलिवंदन वगळता फारसे मोठे सण किंवा शुभकार्यासाठी मुहूर्त नसतात, म्हणून अनेकदा उपरोधिकपणे ही म्हण वापरली जाते. शुभकार्ये खोळंबल्यामुळे काही जणांना हा महिना 'अडगळीसारखा' वाटत असला, तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.
मन्वादि तिथी आणि शिव-शक्ती उपासना
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्ही तिथींना 'मन्वादि' तिथी मानले जाते. 'मन्वंतर' किंवा 'मन्वादि' म्हणजे ज्या तिथीला सृष्टीचा पुन्हा आरंभ झाला असे मानले जाते. या दिवशी शिव आणि शक्तीची विशेष उपासना करण्याची परंपरा आहे, जी साधकांसाठी फलदायी ठरते.
रंगांचा उत्सव आणि श्रीकृष्णाचा प्रेमभाव
फाल्गुन महिन्याची खरी ओळख म्हणजे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी.
होळी: वाईट विचार आणि आचारांचे होलिकेत दहन करून मनातील अढी सोडून देण्याचा हा सण आहे.
श्रीकृष्ण आणि गोपिका: गोकुळात भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रंगोत्सव साजरा केला होता, म्हणून या सणाला आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दक्षिण भारत: दक्षिण भारतात फाल्गुन महिना अत्यंत उत्साहात साजरा होतो. तेथील मंदिरांमध्ये अनेक लहान-मोठे उत्सव याच काळात पार पडतात.
पुरणपोळीचा गोडवा आणि नवीन वर्षाची ओढ
फाल्गुन म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही, तर तो पुरणपोळीचा गोडवा देणारा महिना आहे. जुन्या वर्षाला निरोप देऊन आणि मनातील नकारात्मकता जाळून नवीन वर्षाच्या (गुढीपाडव्याच्या) स्वागतासाठी सज्ज होण्याचा हा मधला काळ आहे.
Web Summary : Phalguna, the last month of the Hindu calendar, marks nature's transition. Celebrated with Holi and Rangpanchami, it symbolizes burning negativity and welcoming new beginnings. A time for devotion and joyful festivities, especially in South India.
Web Summary : फाल्गुन, हिंदू कैलेंडर का अंतिम महीना, प्रकृति के परिवर्तन का प्रतीक है। होली और रंगपंचमी के साथ मनाया जाने वाला यह नकारात्मकता को जलाकर नई शुरुआत का स्वागत करता है। यह भक्ति और आनंदमय उत्सव का समय है, खासकर दक्षिण भारत में।