बेळगावचे दत्त भक्त पंत बाळेकुंद्री महाराज यांनी सांगितले परमार्थाचे १० नियम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 07:05 IST2025-10-09T07:00:01+5:302025-10-09T07:05:01+5:30
Pant Balekundri Maharaj's death anniversary: आज गुरुवार आणि पंत बाळेकुंद्री महाराज यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांचे विचार जाणून घेत परमार्थाची वाट सोपी करून घेऊ.

बेळगावचे दत्त भक्त पंत बाळेकुंद्री महाराज यांनी सांगितले परमार्थाचे १० नियम!
पंत बाळेकुंद्री महाराज हे कर्नाटक (बेळगावजवळ) येथील एक थोर संत आणि दत्त संप्रदायातील निष्ठावान उपासक होते. त्यांचा मुख्य आश्रम बेळगावी जिल्ह्यातील बाळेकुंद्री या गावी आहे. त्यांचे पूर्ण नाव श्री. बाळकृष्ण शिवराम कुलकर्णी होते. त्यांना भक्त प्रेमाने 'पंत महाराज' म्हणत असत. त्यांचा काळ १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध असा होता. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी भक्तांना घालून दिलेले १० नियम जाणून घेऊ.
१. दत्त भक्ती:
पंत महाराज हे दत्त संप्रदायाचे एक महान उपासक होते. त्यांनी भगवान श्रीदत्तगुरूंची उपासना आयुष्यभर अत्यंत साधेपणाने केली आणि इतरांनाही साध्या भक्तीमार्गाचे महत्त्व पटवून दिले.
२. निष्काम कर्मयोग:
त्यांच्या शिकवणीचा गाभा निष्काम कर्मयोग हा होता. कोणताही व्यवहार, कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न ठेवता, केवळ कर्तव्य म्हणून ते करत राहणे, ही महाराजांची मुख्य शिकवण होती. जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाची सेवा मानून करावी, असा त्यांचा आग्रह होता.
३. सर्वधर्म समभाव:
पंत महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. त्यांचे भक्त केवळ हिंदू धर्माचे नव्हे, तर मुस्लिम आणि इतर धर्मीयही होते. त्यांच्या मठात आजही सर्वधर्मीय लोक मोठ्या श्रद्धेने एकत्र येतात.
बाळेकुंद्री येथील मठ
बाळेकुंद्री हे ठिकाण त्यांच्या आध्यात्मिक कार्याचे मुख्य केंद्र बनले. त्यांनी येथे दत्त संप्रदायाची आणि भक्तीची मोठी परंपरा निर्माण केली. आजही बाळेकुंद्री येथे त्यांचा समाधी मठ आहे. या ठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी आणि आनंदी भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी भेट देतात. हा मठ शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी प्रसिद्ध असून, बेळगाव (बेळगावी) येथील एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. पंत बाळेकुंद्री महाराज यांनी आपल्या साध्या आणि निस्वार्थ भक्तीतून लोकांना कर्तव्य, संयम आणि निस्वार्थ प्रेम हेच जीवनातील खरे सुख आहे, हे दाखवून दिले.
दत्तमहाराज या संकेत स्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, आश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत, ‘ॐ नम: शिवाय’चा गजर करीत करीत, त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी बाळेकुंद्री येथे आहे. या स्थानाला आता क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता ‘पंत-बाळेकुंद्री’ म्हणून ओळखला जातो. पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपूर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती - निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला; पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.
पंतांचे वाङ्मय बरेच आहे. ते पद्यमय व गद्यमयही असून "श्रीदत्तप्रेमलहरी" या पुष्प-मालेतून प्रसिद्ध झाले आहे. त्यात मानवी जीवनाचे ध्येय, तत्प्रीत्यर्थ साधना, भोगाचा व त्यागाचा समन्वय, अशा बोधप्रद विषयांचे सुगम विवरण वाचावयास मिळते.
त्यांचे पद्य- वाङ्मय म्हणजे भक्तिरसाची प्रेमगंगा! त्यातील नादमाधुर्य अवर्णनीय आहे, अशा रीतीने
‘का फेडित पापताप! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ॥’
पंतांनी आपली जीवनगंगा सद्गुरूंच्या विशाल प्रेमोदधीत विलीन केली.
पंत महाराज म्हणत, "भक्तांचे दुःखच माझे दुःख; भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिजे ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला आहे. परमर्थसिद्धर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष-पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती-वैभव पुरवून देतो."
परमार्थाकडे नेणारे त्यांचे १० नियम जाणून घेऊ
- श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम
- सामाजिक नीतिविरुद्ध आचार कदापि करू नये.
- देशाचार, कुलाचार, वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे.
- कोणत्याही प्रकारचे व्यसन कामा नये.
- भक्तीची कास सोडू नये.
- सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी.
- मनोविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावी.
- केव्हाहि स्वानुभवसिद्ध गोष्टींवर विशेष लक्ष असावे.
- कोणाचीही भक्ती खंडू नये.
- निर्गुण-सगुण-ऐक्य-भावाने भजनक्रम चालवावा.
- सावधगिरीने समर्थ-वाचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्ताने समर्थचरणी लक्ष ठेवून, सहजानंदात रमत असावे.