काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 06:44 PM2021-07-19T18:44:02+5:302021-07-19T18:44:10+5:30

Aashadhi Ekadashi : मनुष्याचा देह हा केवळ त्याचा देह नाही, त्यात कुणी "मी" नाही  तर पांडुरंग आहे.

Pandharupr is body, Lord Vitthala is the soul | काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल

काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल

googlenewsNext

 
                   देह तितुका प्रारब्धाधीन। 
  त्यासी प्रारब्धे जन्म मरण । त्या देहासी अजरामरण।
                    पामर जन करु पाहती ॥

  
        देहाला जन्म मरण प्रारब्धाचे अधीन आहे. पण काही पामर जन, क्षुद्र, अज्ञानी जन देहाला अजर अमर करु पाहतात.        
       कोण्या एका डाॅक्टरने सांगितले व ते  सोशल मिडियावर खूप व्हायरल झाले. ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हटले की हार्ट मजबूत होते, हृदय मजबूत होते.  यात वाईट काही नाही जर देवाचे स्मरण होते वा स्वास्थ मिळते. चांगलेच आहे. 
          पण आता हे तसे झाले की, मरणभय दाटले उरी । तर म्हणा रामकृष्ण हरि ॥ हरिचे नांवही यासाठी घ्यायचे की शरीराला काही व्हायला नको. संत म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभावो. येथे देह सदैव राहो यासाठी फक्त देवनावो आहे. संतांची नाम घेण्यात देहावर दृष्टी केंद्रित नाही, जो देहात राहतो, ज्याने देह दिला, ज्याने देह केला व तोच जो देह चालवतो त्या पांडुरंगावर संताची भावदृष्टी आहे.  केवळ माझे शरीर जास्तीत जास्त कसे टिकेल हा मनुष्याचा देहाभिमान झाला . त्यासाठीचे देवाचे नांवही केवळ उपचाराचे साधन झाले. मी म्हणजे देह  व हा देह जास्तीत जास्त टिकविला गेला पाहिजे ही मनुष्याची सर्वात प्रमुख इच्छा असते. कारण या देहानेच मी वा माझी ओळख आहे.  पण एकनाथ महाराज म्हणतात,  मनुष्याचा देह हा केवळ त्याचा देह नाही, त्यात कुणी "मी" नाही  तर पांडुरंग आहे.

            काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
                 नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

             काया ही माझी नाही. देवाची पंढरी आहे. कारण यात  विठ्ठल, तो परमेश्वर आत्मरुपाने राहतो, प्रकाशरुपाने नांदतो आहे. 
              हे केवळ रुपकात्मक शब्द नाहीत. कल्पना कविता नाही. हे परम सत्य आहे व हे परम सत्य रुपकाचे शब्दात एकनाथ महाराजांनी मांडले व शब्दही केवळ शब्द नाहीत तर त्यांचे अनुभूतिची शब्दरुपात अभिव्यक्ती आहे.
 
            भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।   
                   बरवा शोभताहे पांडुरंग 
              दया-क्षमा शांति हेंचि वाळुवंट ।
                मिळालासे थाट वैष्णवांचा ॥
              ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
                   हाचि वेणुनाद शोभतसे ॥

भक्ती भाव हा तरल असतो जलाप्रमाणे सहज वाहतो. सर्व अडथळे बाजुला सारुन वाहतो. म्हणून सुंदर रुपक आहे की या कायारुप पंढरीतही भावभक्ती रुप भीमा नदी आहे. भीमेचा अर्थ शक्ती असा  होतो. ह्या भक्तीभावात प्रचंड शक्ती आहे. त्या भावभक्तीरुप भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरुपी पांडुरंग कटेवरी हात ठेऊन उभा आहे. 
         या कायारुप पंढरीतही वाळवंट आहे. भावभक्तीचे भीमेकाठी हे वाळवंट आहे ते दया क्षमा शांतीचे वाळवंट आहे. जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. आमच्या देही हेच वाळवंट क्रोध, सूड, अशांतीचे बनलेले आहे. म्हणून तेथे वैष्णवांचा सत्संग नाही होत. विकारांची केवळ वेडी गर्दी व गदारोळ होत असतो, गोंधळ होत असतो.
           याच काया पंढरीत ज्ञान, ध्यान, पूजाभाव,  विवेक व आनंदाचा मधुर ध्वनी,  वेणुनाद  घुमतो.  हा वेणुनाद आहे प्रणवाचे अनाहताचा. जो अंतरी घुमत आहे.
               
              दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
               ऐसा गोपाळकाला होत असे ॥

      
          काया पंढरीचा गोपालकालाही अदभूत आहे, .  हा गोपाळकाला दहा इंद्रियाचा आहे. गोपाळकाल्यात वेगवेगळे स्वाद असतात. तशीच दहा इंद्रिये सुध्दा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत. त्यांचे वेगवेगळे रसस्वाद आहेत. पण संतासाठी आता इंद्रियांचे अनेक विषय राहिलेच नाहीतच. भिन्न रसस्वाद राहिलेच नाही. तर भक्ती हा एकच रस व एकच भक्ती विषय राहिला आहे. या गोपाळकाल्याचा स्वाद एकच आहे आनंद भाव. तोच एक स्वाद असलेल्या गोपाळकाल्याचा संत आस्वाद घेतात.
                देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
                 एका जनार्दनी वारी करी ॥

             क्षेत्र पंढरपूर ही पंढरी आहे व आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठलभक्त या क्षेत्राची वारी करतात. ह्या क्षेत्र पंढरीतही पांडुरंग नांदतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, काया  हे सुध्दा एक तीर्थक्षेत्रच आहे व क्षेत्रज्ञ पांडुरंग येथे वास करतो आहे. पण पंढरी आहे ती केवळ  या क्षेत्रांपुरतीच नाही, तर ही चैतन्यरुप पंढरी सर्वच देहांमध्ये, सर्वच जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरा मध्ये पाहिली. त्याची अनुभवरुप वारी जनार्दन सदगुरुचा शिष्य एका म्हणजे एकनाथ अविरत करतो.
             आजच्या पावन देवशयनी आषाढी एकादशी दिन पर्वी देहासाठीच कां होईना, हृदयासाठीच कां होईना, पण विठ्ठल नामाचा गजर होवो व या निमित्तातून मनुष्याला आपल्या कायारुप पंढरीतही विठ्ठल वास करतो याचा बोध होवो व या कायारुपी  पंढरीची वारी घडून आत्मारुपी पांडुरंगाचे दर्शन घडो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

सर्व पंढरीचे वारकरी, भागवती संत सज्जनांना श्रध्दा नमन.
संत सदगुरु एकनाथ महाराजांचे चरणी श्रध्दा नमन !

- शं.ना. बेंडे पाटील

Web Title: Pandharupr is body, Lord Vitthala is the soul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.