Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? शनिची अपार कृपा; अमाप फायदा, बक्कळ पैसा-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 20:15 IST2025-04-06T20:12:09+5:302025-04-06T20:15:42+5:30
Numerology: नेमक्या कोणत्या मूलांकावर शनिचे विशेष लक्ष असते? शनि देवाची अपार कृपा लाभू शकते? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? शनिची अपार कृपा; अमाप फायदा, बक्कळ पैसा-लाभ!
Numerology: २९ मार्च २०२५ रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाने आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरु ग्रहाचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश केला. आता जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. एका राशीत शनि ग्रह सुमारे अडीच वर्ष विराजमान असतो. शनि अमावास्येला शनिचे झालेले गोचर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, अद्भूत आणि दुर्लभ योग मानला गेला. शनिचे मीन राशीत गोचर झाल्यानंतर साडेसाती आणि ढिय्या प्रभावाचे चक्र बदलले. केवळ राशी नाही, तर मूलांकांवरही शनि गोचराचा प्रभाव पडत असतो, असे सांगितले जाते.
आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. मूलांक ८ चा स्वामी शनी देव आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ आहे.
स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात, संशोधनाच्या क्षेत्रात नाव कमावतात
मूलांक ८ असलेल्या व्यक्ती मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात, असे म्हटले जाते. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचे समर्थन करतात. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच ते शांत होतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. हे लोक पोलीस किंवा लष्करासारख्या सेवेतही काम करतात. हे लोक संशोधनाच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावतात. शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनी मंदगतीचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश असल्याने जसे तुम्ही कर्म कराल, तसा तो न्याय करतो, असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींचा मूलांक ८ आहे, त्यांच्यावर शनि कृपा असते, असे सांगितले जाते.
जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात
मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव गूढ असतो. ते सहसा खूप शांत स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात काय आहे, याचा थांग लागणे खूपच कठीण मानले जाते. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात, असे म्हटले जाते.
‘या’ क्षेत्रात होऊ शकतो चांगला फायदा!
मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते. खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो. ते बचत योजना आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकतात. मूलांक ८ च्या व्यक्ती बहुतेक अभियंते किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक फायदा देतात, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, शनिचा मीन राशीत प्रवेश झाल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपली आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तसेच मेष राशीची साडेसाती सुरू झाली आहे. ढिय्या प्रभावाबाबत बोलायचे झाले, तर कर्क आणि वृश्चिक या राशींवरील ढिय्या प्रभाव संपुष्टात आला असून, सिंह आणि धनु या राशींवर आता ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.