Not getting success at work? Then change the nature of work, success will surely come! | कामात यश मिळत नाहीये? मग कामाचे स्वरूप बदलून पहा, यश नक्की मिळेल!

कामात यश मिळत नाहीये? मग कामाचे स्वरूप बदलून पहा, यश नक्की मिळेल!

अभिनेत्री मुक्ता बर्वे एका चित्रपटात म्हणते, 'आयुष्यात काहीतरी बाप केले पाहिजे.' पण नक्की काय, हे आपल्याला कळत नाही. प्रत्येकाला वाटते, आपण यशस्वी व्हावे, प्रसिद्ध व्हावे. यासाठी सगळे जण मेहनतदेखील करतात. परंतु कोणाला यश येते, तर कोणाला अपशय! अशा वेळी नवनवे काम शोधण्यापेक्षा कामाचे नवनवे मार्ग शोधले, तर यशाचे दार उघडू शकते. यशस्वी लोक  वेगळे काही करत नसतात, फक्त त्यांची कार्यपद्धती आपल्यापेक्षा वेगळी असते. ती कशी, हे आपण या कथेतून पाहुया.

दोन समवयस्क तरुण. एक मुका असतो, दुसरा अंध. मुका तरुण एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत असतो, तर अंध तरुण त्याच कंपनीच्या पायरीशी बसून भीक मागत असतो. जन्मत: अपंगत्व दोघांना आलेले असूनही एकाने त्यावर मात केलेली असते, तर दुसरा दैवावर हवाला टाकून बसलेला असतो. 

मुका तरुण आपल्या अपंगत्त्वावर मात करत महिन्याला लाखो रुपये कमावतो. ऐषोआरामी जीवन जगतो. आलिशान गाडीतून ये जा करतो. हे सारे काही त्याने आपल्या मेहनतीने, प्रयत्नाने कमावलेले असते. परंतु त्याच्याच वयाचा तरुण दुसऱ्यांसमोर हात पसरण्यात आपली धन्यता मानतो. 

अंध तरुणाने मिळकत वाढावी म्हणून एक पाटी आणून त्यावर कोणाकडून लिहून घेतलेले असते, `मी अंध आहे, मला मदत करा.' ती पाटी वाचून काही जण मदत करतात, तर काही जण करत नाहीत. मुका तरुण रोजच्या वेळेत ऑफिसला येतो. येताना त्या तरुणाला पाहतो आणि त्याची पाटीही वाचतो. तो त्याच्या जवळ जातो. पाटीवरचा मजकूर बदलतो आणि त्याच्या कटोरीत पैसे टाकून जातो. अंध तरुणाला हे लक्षात येते. पण तो काही बोलणार त्याच्या आत मुका तरुण निघून जातो. 

सायंकाळी ऑफिसमधून निघताना मुका तरुण अंध तरुणाकडे डोकावतो, तर त्याच्या पाटीजवळ बरीच माया गोळा झालेली असते. तो आनंदाने तिथे जातो आणि त्याच्या पाठीवर हात ठेवत आणखी काही पैशांची भर टाकतो. अंध तरुण लगेच ओळखतो आणि त्या तरुणाला थांबवून म्हणतो, `तुम्ही तेच आहात ना, ज्यांनी सकाळी माझ्या पाटीवर काहीतरी लिहिले. त्यामुळे काय जादू झाली माहित नाही, लोक थांबून थांबून पैसे देऊ लागले. तुम्ही काय लिहिलेत हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.'

मुका तरुण आपल्या सहकाNयाला बोलावून आपण केलेला बदल वाचायला सांगतो. त्याने पाटीवर लिहिलेले असते, `हे जग सुंदर आहे, आजचा दिवस सुंदर आहे, परंतु मी अंध असल्याने तो पाहू शकत नाही.'

अशा भावनिक संदेशामुळे लोकांना त्याची दया येते शिवाय देवाने आपल्याला ही सृष्टी दिसावी म्हणून ही दृृष्टी दिली, याची जाणीव होते. 

वाक्यातील या छोट्याशा बदलामुळे मोठा परिणाम साधला जातो. एवढी साधी गोष्ट आपल्याला सुचली नाही, याचे अंध तरुणाला वाईट वाटते आणि जाणीव होते, की आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत होतो आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. अंध तरुण दुसऱ्या तरुणाच्या मदतीने त्या कंपनीत सफाई कामगार म्हणून नोकरी पत्करतो आणि हळू हळू आत्मनिर्भर होतो. 

हे दोन तरुण अपंगत्वावर मात करून यशस्वी होऊ शकतात, तर आपण धडधाकट असूनही यशस्वी का होऊ शकत नाही? त्यामुळे काम बदलू नका, कामाचे स्वरूप बदला. यश नक्की मिळेल. 

Web Title: Not getting success at work? Then change the nature of work, success will surely come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.