पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:39 IST2025-04-26T17:38:07+5:302025-04-26T17:39:05+5:30
Nostradamus Predictions: नॉस्ट्रॅडॅमस या भविष्यवेत्त्याने आतापर्यंत केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात त्याने केलेल्या घोषणेनुसार...

पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
नॉस्ट्रॅडॅमस या भविष्यवेत्त्याने १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत. यात, लंडनचा अग्नितांडव, हिटलरचा उदय, अमेरिकेत झालेला ११ सप्टेंबरचा हल्ला आणि कोविड-१९ महामारीचा समावेश होता. अलीकडेच पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यावर भारताची पाकिस्तानला प्रत्युत्तराची तयारी पाहता तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होणार की काय असे चित्र निर्माण होत आहे. याबाबतही नॉस्ट्रॅडॅमसने काही भाकीत वर्तवले होते का? चला जाणून घेऊ!
नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus Predictions) याच्या गूढ भाषेत लिहिलेल्या भाकितांचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावले जातात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, नॉस्ट्रॅडॅमस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने तिसऱ्या महायुद्धाबद्दल त्याने जे भाकित वर्तवले होते, साधारण ती स्थिती सद्यस्थितीशी मिळतीजुळती आहे!
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांनी प्राण गमावले. ते सगळे भारतीय पर्यटक होते. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु धर्म विचारत झाडलेल्या गोळ्या पाहता हा दहशतवादी हल्ला केवळ धार्मिक द्वेषातून केला आहे की आणखीही काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्याला भारताकडून काय उत्तर मिळते याच्या प्रतीक्षेत सगळे भारतवासी आहेत. तर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र ही स्थिती एवढ्यात निवळेल अशी चिन्ह दिसत नाहीत, उलटपक्षी युद्ध सुरु होते की काय अशी भीती वाटत आहे. तसे खरंच होईल का? यासाठी नॉस्ट्रॅडॅमस याने तिसऱ्या महायुद्धासंदर्भात केलेले भाकित जाणून घेऊ.
तिसऱ्या महायुद्धाबद्दल नॉस्ट्राडेमस काय म्हणाले? (Nostradamus Predictions about Thirt War)
नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार त्यांनी म्हटले होते की २०१२ ते २०२५ दरम्यान तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे धर्मयुद्ध असेल असेही त्याने म्हटले आहे. अर्थात आस्तिक-नास्तिकांचा वाद शिगेला पोहोचू शकतो किंवा एकधर्मी अंमल येण्याच्या दृष्टीनेही हे युद्ध होऊ शकते. युद्धाचा निकष म्हणजे त्यातून मार्ग काढणारा एखादा तारणहार शांतता प्रस्थापित करेल. तो युरोपमध्ये नाही तर आशियामध्ये असेल! त्याचा जन्म तीन बाजूंनी वेढलेल्या महासागराच्या प्रदेशात होईल आणि तो त्याच्या अधिकार आणि सामर्थ्यामुळे अद्वितीयपणे शक्तिशाली असेल.
नॉस्ट्रॅडॅमसच्या मते, तिसरे महायुद्ध कधी सुरू होईल? तर, जेव्हा जग धार्मिक कट्टरतेच्या दीर्घ मंथनातून जात असेल, तेव्हा लोक धर्माच्या आधारावर विभागले जातील. जेव्हा रक्तपात, रोगराई, दुष्काळ, युद्ध, दुष्काळ आणि उपासमारीची परिस्थिती असेल तेव्हा हे घडेल. चालू घडामोडींवर आधारित पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले. जगभरात धर्माच्या नावाखाली संघर्ष सुरू आहे. ही परिस्थिती आणखी चिघळत गेली तर तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.